पेन्शन व इतर थकित देयकांच्या मागणीसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची आंदोलनाची हाक

0
73

नगर – एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचार्‍यांना पेन्शन व इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळाले नसल्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सेवानिवृत्त झालेल्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे यांनी दिली. एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सातत्याने कार्य करत आहे. काही प्रश्न चर्चेने सोडविण्यात आले आहे, तर काही प्रश्नांवर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा आर्थिक प्रश्न बिकट बनला आहे. जे कर्मचारी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शनचा लाभ सुरु झालेला नाही. तर ज्या कर्मचार्‍यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली अशांना अद्याप पर्यंत पैसे मिळालेले नाहीत. तसेच मेडिकल बिल, कामगार करार फरक इत्यादीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी वंचित आहे. महामंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बहुतेक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे दोन ते तीन वर्षापासून पैसे मिळालेले नसल्याने त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यातील एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे आर्थिक प्रश्न व पेन्शन थकित आहे, अशा कर्मचार्‍यांनी संघटनेच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर, गंगा कोतकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आवाहन केले आहे. तर संघटनेच्या वतीने लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.