१९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद

0
22

मंदिरातील चोरीसह ५ घरफोड्या आल्या उघडकीस; एलसीबीची कारवाई

नगर – नगर आणि छत्रपती छ.संभाजीनगर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल असलेला मलिंगा उर्फ आकाश कचरु जगधने (वय २२) व त्याचा साथीदार विशाल अरुण बर्डे (दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा) यांच्या मुसया आवळण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या दोघा सराईत गुन्हेगारांनी नेवासा परिसरात मंदीर चोरी व ४ घरफोड्या केल्याची कबुली देत ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. नेवासा खुर्द येथील दुर्गादेवी मंदीरात झालेल्या चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पो.ना.रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, फुरकान शेख, पो.कॉ.किशोर शिरसाठ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, चालक पो.हे.कॉ.चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे पथक करत असताना पो.नि.दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी आकाश ऊर्फ मलिंगा जगधने याने त्याचे साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन, तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.नि.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

या पथकाने तातडीने त्या ठिकाणी जावुन आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने व विशाल अरुण बर्डे यांना पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्यांचे साथीदार अमर बर्डे (फरार) व बंटा ऊर्फ सौरभ (फरार) यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. या दोघांची अंगझडती घेता त्यांचे कडे सोन्या चांदीचे दागिने, रोख र क्कम व विविध कंपनीचे ४ मोबाईल फोन असा एकुण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. या दोघांनी मंदिर चोरी सह ५ घरफोड्यांची कबुली दिली आहे.