मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
52

प्रतिध्वनी का ऐकू येतो?

गोलघुमटाचं नाव ऐकलंय? विजापूरला असलेल्या या इमारतीत आपण जर मित्राला हाक मारली तर ती पुन्हा सात वेळा ऐकू येते. टाळी वाजवली तर तिचेही असेच प्रतिध्वनी ऐकायला येतात किंवा मोठ्या इमारतीत, सभागृहातसुद्धा असे प्रतिध्वनी ऐकायला मिळतात. याचे कारण ध्वनिलहरी एखाद्या अडथळ्यावर आदळून पुन्हा परावर्तित झालेल्या असतात. आपल्याला ठाऊकच आहे की, ध्वनी हवेमध्ये दर सेकंदास ११०० फूट (३४० मीटर) या वेगानं प्रवास करतो. आपण बोलतो म्हणजे विशिष्ट ध्वनिलहरींची स्वरयंत्राच्या सहाय्यानं निर्मिती करतो. जर या लहरींना असलेला अडथळा ५५ फुटांच्या आत असेल तर परत येणार्‍या ध्वनिलहरी नि आपण निर्माण करत असलेल्या ध्वनिलहरी एकमेकीस अडथळा निर्माण करतात नि प्रतिध्वनी न येता नुसताच आवाज घुमतो. जर अडथळा ५५ फुटांच्या (१७ मीटर) पलीकडे असेल तर मात्र प्रतिध्वनी म्हणजे आपण उच्चारलेला शब्द आपल्याला जसाच्या तसा ऐकू येतो. याचे कारण ५५ फूट जाऊन परत यायला ध्वनिलहरींना ११० फूट अंतर कापावे लागते. यासाठी त्यांना १|१० सेकंद एवढा वेळ लागतो. या काळात आपल्या कानावर पडणार्‍या आधीच्या ध्वनिलहरी दूर जातात नि नवा ध्वनी ऐकायला आपले कान पुन्हा तयार होतात. शिवाय मूळ ध्वनिलहरी आणि परत येणार्‍या ध्वनिलहरीत अडथळे निर्माण होत नाहीत आणि स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो. जर जाळीदार नक्षीची भिंत, लाकूड, जाड कापड यांचे अडथळे असतील तर प्रतिध्वनी निर्माण होत नाहीत. याचा फायदा घेऊन नाट्यगृहे, सभागृहे आदी ठिकाणी भिंतीवर असे पदार्थ बसवले जातात. त्यामुळे आपल्याला संवाद वा भाषण नीट ऐकू येत.