त्याने खेकड्याला फारच अलगदपणे आपल्या चोचीत पकडले आणि निघाला. खेकड्याला मजा वाटत होती. आजवर त्याने असा उडत-उडत प्रवास केला नव्हता. तो इकडे-तिकडे पाहात मजेत चालला होता. एवढ्यात त्याची नजर पुढच्या टेकडीवर पडली. तेथे हाडांची रास पडली होती. ती सारी हाडे म्हणजे माशांचे काटे होते; आणि बगळा त्याच बाजूला खेकड्याला घेऊन चालला होता. बुद्धिमान खेकड्याला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. सारा प्रकार त्याच्या ध्यानात आला. मनातच म्हणाला, “अरे माझ्या देवा, असे आहे तर? आपण तर मरणाच्या दारातच उभे आहोत. आता घाबरून, धीर सोडून उपयोग नाही. जोवर संकट येत नाही, तोपर्यंत भिण्याला अर्थ नसतो. पण आता प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात असताना संकटाशी मुकाबला करणे, हाच खरा पुरुषार्थ. नशिबाने मला आधीच सावध केले आहे. अजूनही मला सुटका करता येईल.” असा विचार सुचताच खेकड्याने आपल्या नांग्या झटयात उचलून वर घेतल्या आणि बगळ्याची मान त्या नांग्यांनी करकचून आवळली. त्यासरशी बगळ्याची चोच उघडली. तसा खेकडा त्याच्या तावडीतून मोकळा झाला. मोकळा होताच पटकन् तो बगळ्याच्या पाठीवर चढून बसला. घट्ट पकड होताच त्याने बगळ्याची मान कचकन मोडली, तोडली आणि आपला जीव वाचविला. ढोंगी बगळा मरून पडला.
तात्पर्य : ढोंगी लोकांवर कधी विश्वास ठेवू नये. त्यांच्या गोड बोलण्याला फसू नये.