मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- वेड्या व्यक्तींना शॉक दिल्यास ते बरे होतात का?

0
70

अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही हा प्रसंग पाहिला असेल. नायक वा दुसरा कोणीतरी वेड्यासारखे करतोय. त्याला सात-आठ लोक धरून दवाखान्यात आणतात. त्या दवाखान्यात मग दोन-चार मिनिटे वेडेच वेडे व त्यांच्या विविध अदा आपल्याला दाखवल्या जातात. मग डॉक्टर या आपल्या हिरोला पलंगावर बांधून ठेवतात व त्याच्या डोक्याला तारा जोडून स्विच ऑन करतात. झालं…. मग नायक खूप वेदना झाल्यासारखा चेहरा करतो…. हातपाय जोरजोरात उडवतो. दोन मिनिटांनी तो एकदम शांत, थकलेला वगैरे दिसतो. बर्‍याचदा तो बराही होतो आणि एकदम मॉंऽऽ म्हणून त्याच्या आईला ओळखतो. खरेच असे होते का? शरीरातील सर्व पेशींचे कार्य हे विद्युत-रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते. या प्रक्रियांमुळेच वेड्या माणसाच्या मेंदूत कार्यात्मक बिघाड निर्माण झालेले असतात. बर्‍याचदा औषधांच्या वापराने वेड्या व्यक्तीच्या रोगावर नियंत्रण आणता येते. गंभीर मानसिक रोगात कधी कधी व्यक्ती अनावर होते. प्रसंगी कोणाचा खूनही करू शकते. अशा हिंसक व्यक्तीला उन्मादाच्या अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी शॉक देण्याचा उपयोग होऊ शकतो. शॉक देण्याची ही उपचार पद्धत सर्वच मानसिक रोगांसाठी उपयुक्त नसते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लामसलतीनेच रुग्णालयात असा उपचार करतात. शॉक द्यायचे वा नाही हे डॉक्टर रुग्णाच्या पूर्ण तपासणीनंतरच दीर्घ निरीक्षणांअखेरीस ठरवू शकतात. चुकीच्या रुग्णात शॉक देण्याची पद्धत वापरल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. रुग्णाच्या नातेवाईकांना बर्‍याचदा शॉक देणे म्हणजे वेडावरचा रामबाण उपाय, असे वाटत असते. त्यामुळे डॉक्टरांना ते याबाबत आग्रह करतात. असे करणे किती घातक असते, ते तुम्हाला समजले असेलच.