भुताखेतांबाबत ज्या काल्पनिक गोष्टी असतात त्यामध्ये त्यांच्या उलट्या पावलांचाही समावेश असतो. याचा मतितार्थ इतकाच की, माणसाला पावलं वळवण्यासारखे प्रकार करता येणार नाहीत; मात्र एक महिला असे करू शकते. तिच्याकडील ही कला क्षमता अनेक लोक थक्क होतात. ही महिला आपल्या दोन्ही पावलांना बर्याच अंशी मागे फिरवू शकते. याबाबत तिच्या नावाची गिनिज बुकमध्येही नोंद झाली आहे. केल्सी गु्रब असे या महिलेचे नाव. 32 वर्षांची केल्सी न्यू मेक्सिकोमध्ये राहते. ती तिचे पाय 171.4 अंशांपर्यंत मागे फिरवू शकते. केल्सी म्हणाली, माझे पाय खूपच लवचिक आहेत. मात्र, त्याची मलाही जाणीव नव्हती. बहुतेक लोक त्यांचे पाय काही अंशच फिरवण्यात यशस्वी होतात. सुरूवातीला मलाही वाटले की, मी 90 अंशांपर्यंतच असे करू शकेन: मात्र मला ज्यावेळी याबाबतच्या रेकॉर्डबाबत समजले, त्यावेळी मी त्याचा सराव करण्यास सुरूवात केली. अखेर याबाबतचा विक्रम माझ्या नावावर झाला. केल्सीच्या नावे पावले मागे वळवण्याचा विक्रम महिला गटात आहे, तर पुरूष गटात असा विक्रम अमेरिकेच्या आरोन फोर्डच्या नावावर आहे. तो त्याचे पाय 173.03 अंशांपर्यंत फिरवू शकतो. केल्सीला या कौशल्याचा फायदा आणखी एका कामासाठी होतो. आईस स्केटिंगमध्ये तिला हे उपयोगी पडते, असे तिने म्हटले आहे.