लांडग्याचा बहाणा

0
54

एकदा शेळीने आपल्या करडाला चरण्यासाठी बोकडाबरोबर रानात पाठविले. बोकडाबरोबर करडू गवत खाऊ लागले. पलीकडेच एक लांडगा शिकारीसाठी टपून बसला होता. करडावर त्याची नजर जाताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. करडू चरत-चरत बोकडापासून दूर गेले की त्याला पळवावे, असा लांडग्याचा विचार होता. पण करडू बोकडाची पाठ सोडत नव्हते. त्याच्या जवळपासच चरत होते. करडाला कसे एकटे पाडावे, असा विचार करीत लांडगा हळूच करडाजवळ आला आणि म्हणाला, ‘‘अरे मुला, आईला सोडून आलास हे काही चांगले नाही. आईजवळ तुला पोटभर दूध प्यायला मिळाले असते. इथे रानात काय गवत चघळत बसलास? मी तुला तुझ्या आईकडे नेऊन सोडतो. चल माझ्याबरोबर.‘‘ त्यावर करडू म्हणाले, ‘‘मामा, मला तर आईनेच बोकडाबरोबर चरायला रानात पाठविले. शिवाय तिने मला येताना बजावून सांगितले, बाळा रानात कोणाच्या गोड बोलण्याला फसू नकोस आणि त्या लांडग्यापासून दूरच राहा.’ तुम्ही तर लांडगेमामा. तुम्ही मला येथून थाप मारून दूर न्याल आणि मला टाकाल खाऊन, हे मी केव्हाच ओळखले आहे,’’ आपली मात्रा येथे लागू पडत नाही, हे पाहताच लांडगा मागच्या मागे पळून गेला.

तात्पर्य – आपणच तेवढे शहाणे समजून वागल्यास इतरजण तिरस्कार करतात.