LATEST ARTICLES

शस्त्राचा धाक दाखवून २ घरांवर दरोडा; सोन्याचे दागिने, रोकडसह ऐवज लंपास

नगर – इसळक (ता. नगर) शिवारातील खारेकर्जुने रस्त्यावरील खपके वस्तीवर सात जणांच्या टोळयाने शनिवारी (दि.४) पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला. शस्त्राचा धाक दाखवून दोन घरावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड असा ९१ हजाराचा ऐवज लांबविला. चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अनिल सुधाकर खपके (वय ४५, रा. खपके वस्ती, खारेकर्जुने रस्ता, इसळक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अनोळखी दरोडेखोरांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांची ओळख पटलेली नसून त्यांचा शोध एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घेतला जात आहे. शुक्रवारी रात्री अनिल खपके हे कुटुंबासह घरात झोपी गेले होते. शनिवारी पहाटे सव्वा एक ते सव्वा दोनच्या सुमारास सहा ते सात चोरट्यांनी अनिल यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांच्या हातात कुर्हाड, लाकडी दांडके, कटर होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून घरातील १८ हजार ५०० रूपयांची रोकड, १.५ ग्रॅमचे सोन्याचे जोडवे, चार ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी व एक जाकिट असा ८९ हजाराचा ऐवज चोरला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या रामकिसन वसंत खपके यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घराच्या कंपाऊंडची तार तोडून व घराची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक केली. रामकिसन यांच्या घरात चोरट्यांना दोन हजाराची रोकड मिळून आली. दोन्ही घरातून चोरट्यांनी ९१ हजाराचा ऐवज चोरल्यानंतर ते पसार झाले. सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक मोंढे, उपनिरीक्षक विनोद परदेशी, जाधव यांनी पोलीस अंमलदारांसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नगरकरांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी

श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी महानगरपालिकेच्या सूचनांची अंमलबजावणी करावी : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन नगर – चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएम पीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. एचएमपीव्ही हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने केंद्राच्या आरोग्य विभागाने ३ जानेवारी रोजी निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. नागरिकांनी हे करावे : १) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. २) साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत. ३) ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. ४) भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे. ५) संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी हे करू नये : १) हस्तांदोलन करू नये. २) टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये. ३) आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. ४) डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. ५) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ६) डॉटरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये  

२ कत्तलखान्यावर पोलिसांचे छापे

नगर – शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून ५ जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील २ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.५) करण्यात आली. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्‍या दोन कत्तलखान्यांवर कारवाई केली. या कारवाईत अफवान इस्माईल कुरेशी (वय २७), मुज्जाहिद नुरमोहमंद कुरेशी (वय ३०), आरफाद अश्पाक कुरेशी (सर्व रा. रा.खाटीक गल्ली, शेवगाव), एक विधी संघर्षित बालक, बब्बु अजीज शेख, (वय ५५, रा.दादेगाव रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१० किलो गोमांस, २ गायी, १ कालवड, १ वासरू व ४ सुरे असा २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात २ वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली.

रिक्षातून प्रवास करताना वृद्ध दाम्पत्याची ८५ हजार रुपयांची रोकड गेली चोरीला

नगर – बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी पैसे घेऊन रिक्षातून निघालेल्या दांपत्याकडील ८५ हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सावेडी उपनगरातील स्टेट बँकच्या शाखेपासून ते दिल्लीगेट दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शाम दत्तात्रय कुलकर्णी (वय ६३, रा. निर्मलनगर, भगवान बाबा चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी दुपारी सव्वा वाजता शाम व त्यांच्या पत्नी कल्पना सावेडी उपनगरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी शाखेतून १ लाख १० हजार रूपये काढले व ते पैसे कापडी पिशवीमध्ये ठेवले. दरम्यान, त्यांना नवी पेठ येथील शहर सहकारी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी जायचे असल्याने ते एका रिक्षामध्ये बसून नवी पेठे येथे जाण्यासाठी निघाले. पत्रकार चौकात रिक्षा आली असता तेथे दोन अनोळखी महिला व एक मुलगी रिक्षात बसली. शाम व त्यांची पत्नी दिल्लीगेट येथे उतरून पायी शहर सहकारी बँकेत गेले. तेथे गेल्यानंतर पिशवीतील पैसे पाहिले असता त्यातील थोड्याच नोटा शिल्लक असल्याच्या दिसून आल्या. त्यांनी त्या मोजल्या असता २५ हजार रूपये भरले. रिक्षा प्रवासात ८५ हजार रूपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सावकारी व्यवहाराचे दप्तर जमा न केल्याने एकावर गुन्हा दाखल

नगर – उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांनी रद्द केलेल्या सावकारी परवाना वरील व्यवहाराचे संपुर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन ही सहाय्यक निबंधक कार्यालयात दप्तर जमा न केल्याप्रकरणी एका जणा विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी सचिन अदिनाथ ताठे (रा. सावेडी) यांचे सावकारी परवाना रद्द केलेला होता. त्यानंतर त्यांना दि. २३ सप्टेंबर २०२४ पासुन ते १ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत या परवाना वरील व्यवहाराचे संपुर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन तसेच १६ डिसेंबर २०२४ व १ जानेवारी रोजीच्या सुनावणी वेळी संधी देऊन ही त्यांनी दप्तर जमा केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अल्ताफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन ताठे यांचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील नियम ४६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  

नेहरू मार्केटची जागा अतिक्रमणमुक्त करून भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करावी

अहिल्यानगर हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय झिंजे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी नगर – चितळे रोडवरील नेहरू मार्केटची प्रत्यक्ष पाहणी करून ती जागा अतिक्रमणमुक्त करून भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी अहिल्यानगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यांच्यासमवेत चंद्रकांत उजागरे उपस्थित होते. आयुक्तांनी निवेदनाची दखल घेत प्रत्यक्ष पाहणीसाठी ७ जानेवारी रोजी येण्याचे आवश्वासन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवीन वर्षांत आपल्या आदेशाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेचे स्वागतच आहे. त्याचवेळी शहरातील हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून आपणासमोर काही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. शहरातील चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केटची इमारत १३ वर्षांपूर्वी नवीन मोठे संकुल बांधण्यासाठी भुईसपाट करण्यात आली. आज तेरा वर्षानंतर येथे काहीच झाले नाही. उलट ही जागा महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाच्या चुकीचे स्मारक बनली आहे. मनपाच्या मालकीची ही मोकळी जागा ना गाळेधारक भाजीविक्रेत्यांच्या उपयोगाची राहिली ना महापालिकेच्या कामाची राहिली. याठिकाणी सध्या अनेक अतिक्रमणे झाली आहेत. टपर्‍या टाकण्यात आल्यात. अनेक जण येथे कचरा आणून टाकतात. लघुशंका करण्यासाठी याच जागेचा उपयोग केला जातो. तसेच अनेकांच्या खाजगी चारचाकी, दुचाकी येथे पार्क केलेल्या असतात. संपूर्ण जागाच अतिक्रमणांनी गिळंकृत केली आहे. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास लगेचच लक्षात येईल. मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक चितळे रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. वास्तविक एवढी मोठी मोकळी जागा असताना त्यांना नाईलाजाने रस्त्यावर बसावे लागत आहे. मनपाने या जागेवर पे अ‍ॅण्ड पार्क न करता ती जागा अतिक्रमण मुक्त करून दिल्यास भाजी विक्रेते तिथे बसण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्ताही मोकळा होईल व वाहतुकीला अडथळाही होणार नाही. या जागेची व्यवस्थित साफसफाई करून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्यावे तसेच चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून दिल्यास भाजी, फळ विक्रेत्यांचा मालही सुरक्षित राहिल. तसेच याठिकाणी लाईटचीही व्यवस्था करावी. त्यामुळे या जागेचा अनधिकृतपणे सुरु असलेला गैरवापरही थांबेल आणि भाजी विक्रेत्यांनाही हक्काची जागा मिळेल. पे अ‍ॅण्ड पार्क सारखे धोरण राबवून या परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार नाही हे वास्तव आहे. गोरगरीब भाजी, फळ विक्रेत्यांना न्याय मिळावा असे झिंजे यांनी म्हटले आहे

मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने कर्जदारास ४ महिने सश्रम कारावास

कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार एका महिन्यात भरण्याचे आदेश नगर – व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड न करणार्‍या कर्जदाराला नगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश तेजस्विनी निराळे यांनी ४ महिने सश्रम कारावासाची तसेच कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार एका महिन्यात संस्थेकडे भरण्याचे आदेश दिले आहेत. पोपट बाळासाहेब शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) असे या कर्जदाराचे नाव आहे. कर्जदार शेवाळे यांनी लक्षवेध मल्टीस्टेट च्या पाईपलाईन रोड शाखेतून व्यवसाय वाढीसाठी ४ लाख रुपयांचे कर्ज दि.१९ मे २०२३ रोजी घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्याची मुदत १०० दिवसांची होती. मात्र त्यांनी कर्ज घेतल्या पासून ४ महिने काहीही रक्कम भरली नाही. त्याने कर्ज परतफेडीसाठी संस्थेला ४ लाख ७५ हजारांचा धनादेश दिला. तो संस्थेने दि. १८ सप्टेबर २०२३ रोजी बँक खात्यात भरला असता कर्जदाराच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो न वटता परत आला. त्यामुळे संस्थेने शेवाळे यास नोटीस पाठविली. मात्र त्याने त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संस्थेचे वसुली अधिकारी सुभाष तुकाराम आरडे यांनी अ‍ॅड. आर.बी. गाली यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात कर्जदार पोपट शेवाळे याच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅट १८८१ चे कलम १३८ नुसार दावा दाखल केला होता. त्यावर नगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश तेजस्विनी निराळे यांच्या समोर सुनावणी होवून न्या. निराळे यांनी कर्जदार शेवाळे यास दोषी धरत ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार रुपये एका महिन्यात लक्षवेध मल्टीस्टेट या संस्थेकडे भरण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता

नगर – ख्रिस्त जन्मोत्सव हा सर्व जगभर मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो. या आनंदी क्षणी सर्वांनी एकत्रित येऊन विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे. आजच्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन विविध उपक्रमात सहभागी होत हा उत्सव आनंदाने साजरा केला आहे. अशा उपक्रमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत असतो. यामुळे येणारा काळात आपण अडचणीवर मात कराल. मेळाव्यातून जो आनंद सर्वांना मिळाला आहे, तो वर्षभर पुरणारा आहे. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, अशी शुभकामना रेव्ह.अभिजित तुपसुंदरे यांनी व्यक्त केली. अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत (सी. एन.आय.)च्यावतीने ख्रिस्तजन्मोत्सव २०२४ निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे आदिंसह सर्व कमिटीचे मेंबर्स, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी सर्व सन्मानिय सभासद उपस्थित होते. या आनंद मेळाव्यात लहान मुलांसाठी रनिंग, फुगे फोडणे, लिंबू चमचा तर महिलांसाठी संगित खुर्ची, स्लो मोपेड, कपल्ससाठी सुई-दोरा ओवणे, पुरुषांसाठीही अशाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांसाठी विविध प्रकारच्या खाद्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यांचा आनंद सर्वांनी लुटला. यावेळी केक कापण्यात येऊन फटायांची आतिषबाजी करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह. अभिजीत तुपसुदरे, सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. बिनीत गायकवाड, रविद्रं लोंढे, सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले महिला मंडळ, चर्च सभासद यांचे सहकार्य लाभले

खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते

डॉ. भाऊसाहेब सोनवणे यांचे प्रतिपादन; केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात नगर – खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते. या सोबतच भावनिक विकासही होतो. त्यामुळे खेळात सहभागी व्हायला हवे. स्पर्धेमध्ये शिस्त दाखवा, स्वतःमध्ये सांघिक भावना विकसित करा, अपयश आले की खचून न जाता जिद्दीने परत उभे राहून पुढे जाण्याची तयारी करण्याचे प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे यांनी आवाहन केले. केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेसह स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे हे होते. प्रा.डॉ. अरुणराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सहकोषाध्यक्ष प्रा.डॉ. रावसाहेब पवार, बीएड कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, संस्था समन्वयक डॉ. रवींद्र चोभे, प्रज्ञाताई आसनीकर, माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, सावेडी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काजळे, शाळेचे मुख्याध्यापक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, पालक प्रतिनिधी स्वातीताई कोळपळकर, विद्यार्थी प्रतिनिधी यशराज पाचारणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी दिया काकडे, अविनाश साठी, शिवाजी मगर आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. जिल्हास्तरावर सुवर्ण, रौप्य, कास्य पदक पटकावून विभागीयस्तरावर यश प्राप्त करणार्‍या खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्यातील कलागुण विकसीत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. सुरेखा कसबे यांनी आभार मानले.

महापालिकेचे स्वच्छता अभियान सुरू; स्टेट बँक चौक ते कोठी चौकात स्वच्छता

प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्या वापराव्यात; अभियानात सहभागी होण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आवाहन नगर – म हानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचर्‍यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक शनिवारी शहर व उपनगराच्या एकेका भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवारी महानगरपालिकेने स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. यात या रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्यावर पडलेला कचरा, माती व बांधकाम व पाडकामाचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याच्या दुभाजकाच्यामध्ये साचलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. अभियानात नागरीक सहभागी झाले होते. नागरिकांनी . प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करतानाच शहर स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात नागरीक, सामाजिक संघटनेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.