अपुऱ्या वर्ग खोल्यांचा प्रश्न आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून मार्गी; दोन नवीन वर्ग खोल्यांसाठी निधी मंजूर; महिनाभरात प्रत्यक्ष काम सुरू होणार
नगर – महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. शिक्षणाचा दर्जा कायम राखणाऱ्या शाळेची पट संख्या स्थापनेपासून तब्बल २० पटींनी वाढली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या शाळेसाठी आणखी दोन वर्ग खोळ्यांना अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. एकीकडे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असताना महानगरपालिकेच्या शाळेत पट संख्या वाढत असल्याने या शाळेसाठी व तेथील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन आढावा घेतला. ओंकारनगर प्राथमिक शाळेची स्थापना जून २०११ मध्ये करण्यात आली. त्यावेळी शाळेची पटसंख्या अवधी ४ होती. आमितीला ८१ विद्यार्थी याशाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन वर्गखोल्या असून इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू आहेत. जून २०११ ते जुलै २०१४ दरम्यान शशिकांत वाघुलकर हे एकच शिक्षक शाळेत होते. १५ जुलै २०१४ ला भाऊसाहेब कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर २०१५ पर्यंत शाळा एकशिक्षकी होती. सप्टेंबर २०१५ मध्ये शिवराज वाघमारे यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. शाळा द्विशिक्षकी झाली. सन २०१७-१८ मध्ये शाळेची पटसंख्या ६४ झाल्यावर वषाली गावडे यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. १५ जुलै २०१४ पासून भाऊसाहेब कबाडी हे मुख्याध्यापक म्हणून शाळेचे कामकाज पाहतात. दोनच वर्गखोल्या असल्यामुळे सन २०१९-२० पासून दरवर्षी जूनमध्येच शाळेचे प्रवेश बंद करावे लागतात. विविध उपक्रम व चांगल्या सुविधा असल्याने शाळेला १८ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. आयएसओ मानांकन मिळणारी ओंकारनगर ही अहिल्यानगर महानगरपालिकेची पहिलीच शाळा आहे. जुने रेकॉर्ड मांडणी, व्हीझिटर नोंदवही, विद्यार्थी फाईल, नाविन्यपूर्ण उपक्रम, वृक्षारोपण, लोकसहभाग, कंपोस्ट खत, चप्पल स्टॅन्ड, समित्या फलक, घोषवाक्य, संदेशसुविचार, खिडक्यांना पडदे, स्वच्छता व टापटीपपणा, शिक्षक व विद्यार्थी ओळखपत्र, दिशादर्शक फलक, बोलका व्हरांडा, शालेय क्रीडांगण, क्रीडा साहित्य मांडणी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, कोपरे, पार्किंग व्यवस्था, वीज बचत, पाणी बचत संदेश, स्वच्छता संदेश, स्वच्छ सुंदर शालेय बहिरंग व अंतरंग, प्रथमोपचार पेटी, ई लर्निंग सुविधा, परसबाग, शौचालय सुविधा, अग्निशमन यंत्र, वाचनालय, संरक्षक भिंत, सूचना व कौतुक पेटी, विद्यार्थी गणवेश, विद्यार्थी गुणवत्ता या निकषांच्या आधारे शाळेला आयएसओ मानांकन मिळाले.
सन २०१६ मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा स्वच्छ, सुंदर शाळा पुरस्कार, अहिल्यानगर जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार, हायजिन लंच बॉक्स स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया शाळेसमोर अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, २०२१ मध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार, केंद्र शासनाच्या पोर्टलवर शाळेच्या यशोगाथेचा समावेश, केंद्र
शासनाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत शाळेला फाइव्ह स्टार मानांकन, राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्कार, अहिल्यानगर जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक शाळा स्पर्धेत ओंकारनगर शाळेला द्वितीय क्रमांक, परसबाग निर्मिती स्पर्धेत अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांक असे नऊ पुरस्कार व पारितोषिके या शाळेला मिळाले आहेत. शाळेला आतापर्यंत विविध दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून ८ लाख ५० हजार रुपये लोकसहभाग मिळाला आहे. यातून शाळेत विविध अद्ययावत भौतिक सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. शाळेत टॉयबैंक उपक्रम, शालेय परसबाग, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, विद्यार्थी बचत बँक, शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट, बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, दिनांक तो पाढा, मुक्त बाल वाचनालय, दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा, १०० टक्के उपस्थितीसाठी दरमहा बक्षीस, वाढदिवसाला रोपटे भेट, ज्ञानरचनावादी अध्यापन आदी उपक्रम शाळेत राबवले जातात. शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना विविध सामाजिक संस्थांकडून राष्ट्रीय व राज्यस्तरीय २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम त्यांनी शाळेच्या विकासासाठी वापरली आहे. तसेच शाळेतील सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनाही विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनाही विविध स्पर्धामध्ये पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. या शाळेचा आलेख चढता असल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे. याचाच विचार करून शाळेला आणखी दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर करून दिला आहे. येत्या महिनाभरात वर्ग खोल्यांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.