LATEST ARTICLES

ना. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक

नगर – १९३१ साली जनगणने नुसार देशात ५४ टक्के म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त ओबीसी समाज आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी उमेदवारी स्वतः हून मागे घेण्याची भूमिका घेतली. ही ओबीसी समाजासाठी लेशदायक बाब आहे. महाराष्ट्रात केवळ एका समाजाच्या दबावाला बळी पडून महायुतीचे सरकार ना. भुजबळांना उमेदवारी नाकारत असेल तर महायुतीच्या सरकारला एकट्या समाजाच्या मतांची गरज आहे का? ओबीसी समाजाच्या मतांची गरज वाटत नाही काय? हा थेट सवाल सर्व पक्षांना केला आहे. छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्राच्या सीमा अडवायचा तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज फक्त उमेदवारी अर्ज भरावयाचे काम सुरू आहे, मतदान होण्याचे काम बाकी आहे. जेव्हा ओबीसी समाज अडचणीत होता, तेव्हा ना. छगन भुजबळ यांनी आमच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्रात महाएल्गार मेळावे घेतले. देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने भुजबळ यांची उमेदवारी डावलून ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी यांनी दिला आहे. माळीवाडा येथे महायुती सरकारने छगन भुजबळ यांची उमेदवारी डावलल्याने सकल ओबीसी समाज व समता परिषदेच्यावतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी समता परिषदेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष अनिल निकम, बबन भूमकर, डॉ. स्मिता तरटे, गोरख आळेकर, दत्तात्रय व्यवहारे, गणेश व्यवहारे उपस्थित होते.

जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

नगर – जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये जिल्ह्यात १७ ते ३० एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोयात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांचा निषेध

ओबीसींवरील अन्यायाविरोधात लढा देणार : दिलीपराव खेडकर नगर – राज्यासह देशात ओबीसीचे मोठे संघटन छगनराव भुजबळ यांनी उभे केले, ओबीसींवर ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्याय्त्या वेळी छगनराव भुजबळ यांनी पदाची तमा न बाळगता ओबीसींच्या हक्कासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. प्रसंगी सरकारच्या विरोधातही भुमिका घेतली. अशा राज्यातील सर्व पक्ष, घटकांतील ओबीसींसाठी काम करणार्‍या भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती, परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शविणे ही निषेधार्थ बाब आहे. आज राज्यात लोकसभेची निवडणुक होत असतांना, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे जे लोक या प्रवृत्ती मागे आहे, त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहे. आम्हीही या अशा घटनेचे निषेध करुन ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे. ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणार्‍यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्यावतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबीरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबीरे, आकाश वारे, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहिफळे, नवनाथ खेडकर आदि उपस्थित होते. खेडकर म्हणाले, आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओबीसींचे मजबूत संघटन राज्यात केले जात आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसींना डावलण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत, त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरमधील अनेक पदाधिकार्‍यांनी ओबीसी नेते भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांचा तीव्र निषेध करुन या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे अमिष दाखवून नोकरदाराची ३० लाख रुपयांची फसवणूक

नगर – सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीकडे शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्याने नगरमधील नोकरदाराची ३० लाख रूपयांची फसवणूक झाली. फसवणूक झालेली व्यक्ती आनंदनगर, गुलमोहर रस्ता, सावेडी येथे राहात असून त्यांनी शनिवारी (दि. २० एप्रिल) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून एका व्हॉट्सअप नंबर धारक अनोळखी व्यक्तीविरूध्द भादंवि कलम ४१९, ४२० सह आयटी अ‍ॅट कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार १६ जानेवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायची असल्याने ते सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर माहिती घेत असताना त्यांची एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख झाली. त्या व्यक्तीने फिर्यादीसोबत व्हॉट्सअप नंबरवरून संपर्क केला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवला व सुरूवातीला २० लाख व नंतर १० लाख रूपये असे एकुण ३० लाख रूपये शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीसाठी दिले. दरम्यान गुंतवणूक केल्यानंतर देखील समोरच्या व्यक्तीने फिर्यादीला नफा दिला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत केली नाही. फिर्यादीने त्या व्यक्तीसोबत वारंवार संपर्क करून पैशाची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर येथील सायबर पोलीस ठाण्यात संपर्क करून २० एप्रिल रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.

संभाषण कौशल्य व आर जे कार्यशाळेचा रेडिओनगरमध्ये समारोप

नगर – बदलत्या समाजाचे लोक माध्यम स्नेहालयाचे रेडिओनगर ९०.४ एफ् एम येथे संभाषण कौशल्य व रेडिओ निवेदन (आर.जे) हा तीन महिने कालावधीचा नाविन्यपूर्ण कोर्स व कार्यशाळा लेखक, संगीत समीक्षक व निवेदक सुहासभाई मुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. व त्याचा समारोप झाला. यावेळी प्रशिक्षक व समन्वयक सुहासभाई मुळे म्हणाले की आजकाल सगळीकडे संवादाचा अभाव दिसून येतो, त्यामुळे योग्य अशा नेमया मोजया शब्दात योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे संवाद साधणे ही एक दुरापास्त गोष्ट झाली आहे. कुठल्याही प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे संभाषण असते आणि तीच पायरी जर कमकुवत असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी कोलमडणार हे निश्चित आहे. आजच्या पिढीमध्ये निरीक्षण, ग्रहण, चिंतन मनन, स्मरण व शेवटी प्रभावी सादरीकरण या सर्वच गोष्टींचा अभाव असल्यामुळे आजचे तरुण मानसिक व वैचारिक दृष्ट्या अतिशय कमकुवत ठरत आहेत. यासाठी सदर कोर्सची व सिलॅबस ची संरचना करून ही कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळा पूर्ण करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना रेडिओनगर तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्नेहालयाचे संचालक भूषण देशमुख, साहित्यिक व अशोकराजे निंबाळकर, केंद्रप्रमुख संदीप क्षीरसागर, ग्राहक पंचायतीचे प्रमुख गजेंद्र क्षीरसागर, वगैरे प्रभृती उपस्थित होते. यावेळी भूषण देशमुख यांनी संभाषण कौशल्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाच्या कानाकोपर्‍यात सहज पोहोचू शकतो, त्यासाठी रेडिओसारखे दुसरे सोपे माध्यम नाही, आणि त्यासाठी सदर कोर्स करणे अतिशय फायदेशीर ठरेल असे सांगितले. अशोकराजे निंबाळकर यांनी सदर कोर्स बाबत बोलताना १४ विद्या आणि ६४ कला यामध्ये सर्वात अंतर्भाव असलेली, व प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी संभाषण कौशल्य ही कला सुहासभाई मुळेंसारख्या बहुआयामी, बहुश्रुत आणि अनुभवी व्यक्तीकडून अवगत करणे हे फार मोठे प्रशिक्षण आहे, याचा उपयोग सर्वांना आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये निश्चित होईल असे प्रतिपादन केले. कार्यशाळेमधे संदीप क्षीरसागर यांच्या सहकार्याने, सौ. चारू शिवकुमार, किरण खोडे, अदिती भुसारे, भार्गवी क्षीरसागर, अ‍ॅड. अंकिता सुद्रिक प्रशांत छजलानी, स्वाती बागडे, स्वयम भास्कर, संतोष, कैलास दळवी, राजू ढोरे, मकरंद घोडके, नरेंद्र बागडे यांनी सहभाग घेतला. याच कार्यशाळेची पुढील महिन्यामध्ये (जून २०२४) दुसरी बॅच घेण्यात येणार असून माहितीसाठी ९० ११ ११ २३ ९० यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नावातच ‘जय’ असल्याने सुजय विखेंचा पराभव अशक्यच

नगर – एक तरुण नेता म्हणून खा. सुजय विखे पाटील चांगले काम करत आहेत. लोकांच्या सुख-दु:खात ते सहभागी होत असतात. तरुणांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ‘सुजयच्या नावातच जय आहे, त्यामुळे सुजय विखेचा पराजय अशय आहे, त्यांना आता फक्त लीड वाढवायचे आहे आणि विरोधकांच्या ‘लंके’चे दहन करायचे आहे. उद्याच्या हनुमान जयंतीदिनी रावणरुपी महाविकास आघाडीच्या लंकेच्या दहनाचा संकल्प करा’, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सोमवारी (दि.२२) नगर शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना.दिपक केसरकर, आ. प्रविण दरेकर, आ. राम शिंदे, आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आ. अरुण जगताप यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, देशात ‘मोदी गॅरंटी’ चालते. मोदींच्या नखाचीही सर ‘इंडी’ आघाडीला येणार नाही. राहुल गांधींचं तर अजून लॉन्चिग व्हायचे आहे. कोणाला स्वप्नातही वाटणार नाही की राहुल गांधी पंतप्रधान होतील. विरोधकांच्या ‘लंके’चे दहन करा; ड्रामा करून कोणी निवडून येवू शकत नाही त्यामुळे ‘नो लंके, ओन्ली विखे’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरकरांना आवाहन पंतप्रधान होण्याचा अधिकार केवळ मोदींचा आहे, कारण त्यांनी देशातील जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी त्यांचे जीवन देशाला समर्पित केले आहे. त्यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी ‘नो लंके ओन्ली विखे’ म्हणत सुजय विखेंना विजयी करावे, ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. त्यामुळे १३ मे रोजी सुजय विखेंना मोठे मताधिय देऊन विरोधकांना पाणी पाजा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान आणि सुजय विखे दुसर्‍यांदा खासदार झाल्यानंतर अहिल्यानगरच होणार. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला आहे. आता दिल्लीतून त्यावर शिक्कामोर्तब झाले की, त्याची अंमलबजावणी होईल, त्यासाठी सुजय विखेंना निवडून द्यायचे आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे. मोंदीचे हात बळकट करण्यासाठी विखेंना निवडून द्या. पुढच्या पाच वर्षात बलशाली भारताची निर्मिती होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राने मोदींच्या पाठीशी ताकद उभी करावी, भारत बलशाली होणार आणि महाराष्ट्रही बलशाली होईल. महायुतीच्या विकासाच्या गाडीत सर्वांनी बसावे आणि सुजय विखे या तरुण, तडफदार खासदाराला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी सुजय विखे यांनी आभार मानले.

न्याय मिळण्यासाठी नाभिक समाजाच्या नेत्यांनी पक्षाच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे

कल्याण दळे यांचे आवाहन; महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सभा नगर – नाभिक समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपली संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या ताकदीमुळे राजकीय पक्षांना नाभिक समाज कसा एकत्रित आहे हे समजले. त्यामुळेच त्यांनी आपल्या समाजाच्या नेत्यांना विविध पक्षाच्या सेलपदी नियुत्या दिल्या. त्यामुळे पक्ष आणि संघटना वाद निर्माण होतो. आपल्या समाजाच्या नेत्यांनी अशा पक्षांच्या सेलचे पदाधिकारी असणार्‍यांनी राजीनामे द्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केले. नगर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, सचिव पांडूरंग भवर, एकलव्य संघटेनेचे शिवाजी ढवळे युवा प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, कर्मचारी संघटनेचे उत्तम सोलाणे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, महिला सरचिटणीस अ‍ॅड.मोनिका निकम, रोहिणी बनकर, वनिता बिडवे आदि उपस्थित होते. श्री.दळे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाला न्याय द्यायचा असेल तर संघटनेत काम करा. सेलच्या, पक्षांचे राजीनामे द्यायची धमक दाखवा व संघटनेचे काम करा, असे आवाहन करुन शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत आढावा घेण्यात आला. कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता विधानसभेत आपले किमान १० आमदार तरी निवडून येतील, असा विश्वास श्री.दळे यांनी व्यक्त केला. यावेळी कल्याण दळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पदाधिकार्‍यांनी समाजासाठी आम्ही पक्ष, सेलचे राजीनामे देऊ आणि संघटनेत काम करुन आपली ताकद दाखवू, असे जाहीर केले. २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण दळे, कार्याध्यक्षपदी दामोदर बिडवे, सरचिटणीसपदी पांडूरंग भवर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. या निवडीचे सर्वांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष अनिल निकम, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, बापूसाहेब भागवत, संभाजी गवळी, अनिल औटी, निलेश पवळे, विशाल सैंदाणे, अजय रंधवे, संतोष जाधव, सागर साळूंखे, आशिष ताकपिरे, बबन काशिद, सतीश साळूंखे, बाबूराव दळवी, रमेश बिडवे, बाबुराव ताकपिरे, भाऊ बिडे, शाम जाधव, शाम साळूंखे, सुनिल आतकर, विजय क्षीरसागर, सागर शिंदे, कांतीलाल कोकाटे, सुशिल थोरात, वामन औटी, नंदकुमार औटी, श्रीपाद वाघमारे, सिद्धांत झेंडे, मनोज शिंदे, मनोज नन्नवरे, निलेश शिंदे आदिंनी घेतले. या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक बाळासाहेब भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी गवळी यांनी केले तर आभार अनिल निकम यांनी मानले.

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद : उमेश पगारिया

सौ.तेजल पगारिया यांचा जन्मदिन आरोग्य शिबीराने साजरा  नगर – आचार्य आनंदऋषीजींची प्रेरणा घेऊन जैन सोशल फेडरेशनच्या सदस्यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे छोटे रोपटे लावले. आज ते वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ज्या समाजात आपण राहतो. त्या समाजाचे देणे लागतो.या सद्भावनेतून जैन सोशल फेडरेशनचे सदस्य निस्वार्थपणे रुग्णसेवेचे कार्य करीत आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये परमेश्वर असल्याने तसेच औषधोपचारांसोबतच डॉटर्स व परमेश्वरासारखी त्यागाच्या भावनेतून काम करणारी माणसं येथे कार्यरत असल्याने येथे येणारा रुग्ण बरा झाल्याशिवाय राहत नाही. निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक उमेश पगारीया यांनी केले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे सौ.तेजल राज पगारीया यांच्या जन्मदिना निमित्त बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोजक उमेश पारसमल पगारीया (नागपूर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सौ सुजाता पगारिया, सौ.तेजल पगारिया, बाळासाहेब (कर्नावट) कोयळीकर (पुणे), सौ.आशा कोयळीकर, उद्योजक पेमराज बोथरा, सतीश बोथरा, वैशाली जैन, उमेश जैन (मुंबई), दीपक शिंगवी, सौ.स्मिता सिंगवी, डॉ.मोनिका लोढा, संदीप लोढा, किरण बोरा, शांतीलाल बोरा, संतोष बोरा, मनोज बोरा, अशोक बोरा, राजेंद्र बोरा, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, निखिलेंद्र लोढा, सतीश लोढा, वसंत चोपडा, सुनील मालू, शिबिराचे तज्ञ डॉ.श्रेयस सुरपुरे, डॉ.सोनाली कणसे, डॉ.रुपेश सिकची, डॉ.वैभवी वंजारे आदी उपस्थित होते. उद्योजक पेमराज बोथरा म्हणाले, स्व.मानकचंद बोथरा यांनी परिवाराला दिलेल्या समाजसेवेची परंपरा सौ.तेजल पगारिया यांनी पुढे चालवली आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जन्मदिन साजरा करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे. या शिबिरामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल. डॉ.मोनिका लोढा म्हणाल्या, सौ.तेजल पगारीया यांनी जन्मदिनाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कुठल्याही प्रकारची पार्टी न करता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य महान आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल मुळे अनेक रुग्णांच्या यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आले आहे.तसेच सवलतीच्या दरात व मोफत रुग्णसेवा मिळत असल्याने याचा फायदा अनेक रुग्णांना होतो. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोठे कार्य उभे राहिले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे बालरोग विभागात एनआयसीयु १६ बेडचा अत्याधुनिक विभाग आहे.येथील तज्ञ डॉटरांचा दहा वर्षाचा अनुभव असल्याने बालकांचे आरोग्य चांगले व्हावे. दीर्घायुष्य मिळावे. यासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा फायदा समाजाला मिळावा. यासाठी अत्याधुनिक बालरोग विभाग कार्यरत आहे. शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले.

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगर शहरात शोभायात्रा, त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष

आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात महावीर स्वामींचे गुणगान, विविध स्पर्धांचे बक्षिसे जाहीर नगर – अहिंसा परमो धर्म: अशा महान परममंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्‍या भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक (जयंती) रविवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले. भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सकाळी ७.३० वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, डोयावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपाची (प्रसाद) गाडीही होती. आनंद संस्कार शिक्षा अभियान मंडळाच्या मुला मुलींनी लेझीमचे आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच त्यांनी हातात जैन ध्वज व भगवान महावीरांचे संदेश असलेले फलक घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रा कापडबाजार जैन मंदिर येथून निघालेली शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचार आदर्शऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी अलोकऋषीजी महाराज, साध्वीरत्ना पुष्पाकंवरजी, आराधनाजी म.सा. आदी साध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, अशोक बोरा, संतोष गांधी, सतीश लोढा, अभय लुणिया, नितीन कटारिया, आनंद चोपडा, महावीर बडजाते, शेखर गांधी आदी उपस्थित होते. यावेळी दिगंबर जैन समाजातील महिला भगिनींनी भगवान महावीर यांचे स्तुतीगाण सादर केले. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आदर्शऋषीजी महाराज म्हणाले की, आज २६०० वर्षानंतरही महावीर स्वामींचे विचार मानवजातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते. आपण भगवान महावीर स्वामींचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. आज जगात युध्दजन्य परिस्थिती आहे. अशावेळी भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे. भगवान महावीर यांच्यामुळे आपण आहोत हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मनोमन त्यांचे तत्वज्ञान जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करावा. कार्यक्रमाच्या शेवटी गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली. जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करून विविध स्पर्धांचा निकाल जाहीर केला. तो पुढीलप्रमाणेय्रांगोळी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – गुगळे परिवार (चितळे रोड), (निता, मिना, काजल, स्नेहल, सिया, प्रतिक्षा, रोहित, नितीश, निखिल गुगळे). व्दितीय क्रमांक – मिनल पारख, राखी गांधी, साक्षी चंगेडिया, पूनम चोरडिया (आनंदधाम ), तृतीय क्रमांक विभागून – सोनाली बोरा, पूजा चंगेडिया, प्रेक्षा नहार, दर्शना नहार (नवीपेठ). उत्तेजनार्थ – मित चंगेडे (ख्रिस्तगल्ली), पलक कटारिया, प्रिती डागा (मुंजोबा चौक), प्रिया प्रशांत गांधी (ख्रिस्तगल्ली), आरती, शेजल कटारिया (डाळमंडई, जय आनंद फौंडेशन), ईश्वरी बोरा (लक्ष्मी कारंजा), आरती, वृषाली, जानव्ही, चेतना भालेकर. चौक सजावट स्पर्धा- प्रथम क्रमांक- गुगळे परिवार (चितळे रोड ), व्दितीय क्रमांक – दिगंबर जैन मंदिर (गुजरगल्ली), तृतीय क्रमांक- जय आनंद महावीर युवक मंडळ (नवीपेठ). उत्तेजनार्थ- वर्धमान तरूण मंडळ (ख्रिस्तगल्ली), सराफ बाजार (प्रशांत मुथा), आडतेबाजार मंडळ. या स्पर्धांचे परीक्षण शैला गांधी व हेमा गुगळे यांनी केले. मिरवणुकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत लकी ड्रॉ विजेते बॅच क्रमांकानुसार काढण्यात आले. यात नवीपेठ कोपरा येथे रमेश पोखरणा यांच्या हस्ते ३८६ बॅच क्रमांक, ख्रिस्तगल्ली कोपरा येथे विजू गुंदेचा यांच्या हस्ते ६९१ बॅच क्रमांक आणि सहकार सभागृह रोडवर प्रमोद गांधी यांच्या हस्ते ३७३ बॅच क्रमांकाचा लकी ड्रॉ निघाला. सर्व बक्षिसे संबंधितांनी कापडबाजार जैन मंदिर येथून घेवून जावे, असे आवाहन सुभाष मुथा यांनी केले आहे.

बालरंगभूमी परिषदेचे ‘हसत खेळत बालनाट्य शिबीर’ सुरू

नगर – बालरंगभूमी परिषद, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने ११ दिवसांचे बालनाट्य शिबिर २० ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले असून शिबीरास बालगोपाळांच्या प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिराचे उदघाटन रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर तसेच नाट्यपरिषद मध्यवर्ती मुंबई चे कोषाध्यक्ष सतीश लोटके व बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी यांच्या हस्ते नटराज पूजन करून झाले. प्रास्ताविक करताना बालरंगभूमी नगर शाखेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके म्हणाल्या की बालरंगभूमी परिषदेच्या वतीने दरवर्षी नाट्य शिबीराचे आयोजन केले जाते. नाट्यकलेचे धडे मुलांना दिले जातात. सभा धीटपणा, वत्कृत्व, भाषा, रंगमंचावर वावर, एकपात्री, नाट्यछटा याबाबत शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेक बालकलाकार या कार्यशाळेत सहभागी होतात. बालराज्यनाट्य स्पर्धेत अनेक कलावंतांना याचा फायदा झाला आहे. या कार्यशाळेत नाट्यकलेतील सर्व प्रकार व नृत्य कला शिकविली जाणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे बाल कलाकारांना शिकविणारे प्रा. डॉ. अमजद सय्यद तसेच नाट्यपरिषद मध्यवर्ती चे कोषाध्यक्ष सतीश लोटके, तसेच सिनेनाट्य अभिनेते देवीप्रसाद सोहनी, नगरचे दिग्दर्शक शैलेश देशमुख हे नाट्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत तर सागर अलचेट्टी हे नृत्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत. मनोगतात श्री. येलुलकर यांनी बालरंगभूमी परिषदेच्या उपक्रमांचे कौतुक केले. बाल कलाकारांमधूनच उद्याचे मोठे नाट्यकर्मी घडणार आहेत. नगर शहराचा सांस्कृतिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले. शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे यांनी सूत्रसंचालन केले. तर उपाध्यक्ष शैलेश देशमुख यांनी आभार मानले. तेजा पाठक, सोनाली दरेकर व संस्थेचे पदाधिकारी टीना इंगळे, सुजाता पायमोडे, विराज अडगटला, सपना साळुंके, भाग्यश्री दातखिळे, मैथिली जोशी, तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांचे पालक याप्रसंगी उपस्थित होते. या शिबिरात सहभागी होणार्‍या बाल कलाकारांचा ४ मे रोजी कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगर मध्ये होणार्‍या शंभराव्या नाट्य संमेलनामध्ये देखील सहभागी होण्याची संधी बाल कलावतांना मिळणार आहे.