LATEST ARTICLES

शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळच दररोज होतेय वाहतुकीची कोंडी

वाहनचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप, मात्र वाहतूक शाखेला गांभीर्यच नाही नगर – अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे असणारे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयालगत च्या पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र याचे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोणतेही गांभीर्य वाटत नसल्याने ते त्याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तसेच दहावी च्या परीक्षाही लवकरच सुरु होणार आहेत. शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी या रस्त्यानेच जावे लागत असते. त्यातच सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पत्रकार चौकापासून जवळ असणारे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची ये जा सुरु असते. या रुग्णवाहिकांना पण या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आणि अनेक वेळा रुग्णवाहिका रुग्णांना नेत असताना या वाहतूक कोंडी मध्ये अडकलेली पाहायला मिळते. जर एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचारांची आवश्यकता असेल आणि वाहतूक कोंडी मुळे त्याला वेळेवर हॉस्पिटल मध्ये दाखल करता न आल्याने तो जर दगावला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक शाखेचे अस्तित्व जाणवेना पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंत रस्त्यावरील वाहतूक कोंडीबरोबरच अहिल्या नगर शहरामध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोणत्याच भागात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसत नाहीत.त्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी करण्यास वाव मिळतो त्याचे परिणाम सर्वसामान्य नगरकरांना दररोज भोगावे लागते. त्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे अस्तित्वच जाणवत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्काळ लक्ष घालून वाहतूक कोंडीवर उपायोजना करण्याचे आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेला द्यावेत अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

टॉरल इंडिया कंपनीची सुपा एमआयडीसीत ५०० कोटींची गुंतवणूक

१२०० जणांना रोजगार मिळणार, अजूनही कंपन्या संपर्कात – खा.निलेश लंके   नगर – टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या बरोबरच अजूनही अनेक कंपन्या येणार असल्याची माहिती खा. निलेश लंके यांनी दिली. टॉरल इंडियाने त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा उत्पादन डिझाईनपासून ते गुणवत्ता चाचणी, रंगकाम, असेंब्ली, आणि वितरणापर्यंत व्यापक ॲल्युमिनियम सॅड-कास्टिंग सोल्यूशन प्रदान करते. उर्जा संरक्षण एरोस्पेस, सागरी, रेल्वे आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी विस्तारित सुपा येथील सुविधा चार पट मोठी असेल. या महत्वपुर्ण गुंतवणूकीसह टॉरेल इंडियाचे उद्दीष्ट नवोपक्रमांना चालना देणे, स्थानिक प्रतिभेला सक्षम करणे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेत योगदान देताना महत्वाच्या उद्योगांमध्ये भारताचे स्वावलंबन वाढविणे आहे. ५०० कोटी रूपयांची गुतवणूक टॉरल इंडियासाठी एक निर्णायक क्षण आहे, कारण आम्ही प्रगत उत्पादनात नवीन उंची गाठत आहोत. सुपा प्लान्टचा  विस्तार केवळ क्षमता वाढविण्यासाठी नाही तर तो उद्योगांचे विकेंद्रीकरण टियर २ आणि टियर ३ क्षेत्रांना सक्षम बनविणे आणि १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून योगदान देण्याबद्दल आहे. असे कंपनीचे एमडी व सीईओ भरत गिते यांनी सांगितले. सुपा एमआयडीसीची बदनामी करणाऱ्यांना चपराक सुपा एमआयडीसी हे शांततेचे प्रतिक आहे. त्यामुळे अनेक उद्योग येथे येत आहेत. अनेक कंपन्या या औद्योगिक क्षेत्रात येण्यास तयार असून ते उद्योजक, कंपनी व्यवस्थापन आपल्या संपर्कात आहेत. असे सांगत सुपा औद्योगिक क्षेत्राची बदनामी करणे हा काही लोकांचा धंदा आहे. त्यांनी आपल्याकडे काय चालले आहे हे आगोदर पहावे त्यानंतर  इतरांवर चिखलफेक करावी. असा टोला खा. निलेश लंके यांनी लगावला आहे.

परीक्षा कालावधीत जारी केलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक पुढे ढकला अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालणार

परीक्षेत गुंतलेले शिक्षक उमेदवार प्रचार कसा करणार? विरोधी संचालकांची मागणी नगर – परीक्षा कालावधीत जारी करण्यात आलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी विरोधी संचालकांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन १४ फेब्रुवारीला जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी मुटकुळे यांना देण्यात आले. यावेळी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे व क्रीडा महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे आदी उपस्थित होते. सदर निवडणूक पुढे न ढकळल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. संस्थेचे ९,१५२ सभासद असून हे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहे. सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या वार्षिक परीक्षा चालू झाल्या असून, त्याचे कामकाज २० मार्चपर्यंत चालणार आहे. सदर परीक्षेच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पूर्णपणे गुंतलेले आहेत. मार्च २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापासून पाचवी ते नववीच्या परीक्षेचे शासनाने आयोजन केलेले आहे. परीक्षा काळात शिक्षकांच्या सभा आयोजन, भेटीगाठी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. जिल्ह्यात १४ तालुयात सुमारे ७०० शाळा असून त्यामध्ये ९१५२ सभासद विखुरलेले आहेत. निवडणूक काळात परीक्षा असल्याने उमेदवारांना फॉर्म भरणे, प्रचार करण्यासाठी रजा मिळू शकत नाही. या अडचणी पाहता निवडणूक लोकशाही पद्धतीने होणे अशय असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  ३१ जानेवारी रोजी संस्थेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना परिक्षा व पर्यवेक्षण इत्यादी शालेय कामकाजासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी परिक्षाच्या काळात निवडणुकीचा प्रोग्रॅम लागणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र तरी देखील परीक्षा काळात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने शिक्षक वर्गामध्ये नाराजी पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २३ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द करून ती ३१ मे च्या दरम्यान घ्यावी, किंवा जून, जुलै २०२५ मध्ये घेण्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षा काळात राबविण्यात येत असलेल्या निवडणुक प्रकियेमुळे शिक्षक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचणे अशय होणार आहे. तर परीक्षा काळात कर्तव्य बजवावे की, प्रचार करावे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. या परिस्थितीची जाणीव ठेऊन जिल्हा उपनिबंधकांनी सदर निवडणुक प्रक्रिया दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परीक्षा काळात घेऊ नये, असे विरोधी संचालक महेंद्र हिंगे म्हणाले.

रेडिओ दिनानिमित्त चित्रकूट गुरूकुलचा चिमुरडा अयांश गोंधणे बनला ‘आरजे’

नगर – जागतिक रेडिओ दिनानिमित्त सावेडी येथील चित्रकूट गुरुकुलमधील एलकेजीचा विद्यार्थी अयांश गोंधणे याने आरजेची भूमिका साकारत रेडिओ ९०.४ एफएमच्या श्रोत्यांना खिळवून ठेवले. चिमुरड्यांना संपर्क माध्यमांची ओळख व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळेल या दृष्टीने चित्रकूट गुरूकुल विशेष उपक्रम राबविते. अयांशने संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत प्रसारित होणार्‍या विशेष कार्यक्रमात आपला सुंदर आवाज आणि निरागस उत्साहाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वर्गशिक्षिका हर्षदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सारिका आनंद, संस्थेचे संचालक संजय चव्हाण यांच्या प्रोत्साहनाने अयांशने अतिशय आत्मविश्वासाने श्रोत्यांना आनंददायी अभिवादन आणि मनमोहक कवितांनी गुंतवून ठेवले. त्याच्या निरागस पण प्रगल्भ सादरीकरणाने अनेकांना हसू आणले आणि हे सिद्ध केले की वय हा प्रतिभेचा अडथळा नाही. श्रोत्यांनी उत्सुकतेने रेडिओ ट्यून केले आणि या उपक्रमाची प्रशंसा केली. लहान मुलांना व्यक्त होण्यासाठी अधिक व्यासपीठांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी चित्रकूट गुरुकुलच्या प्रयत्नांचे पालक आणि शिक्षकांनी कौतुक केले. मुलांना अभिव्यक्तीचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरणा देताना या कार्यक्रमाने संवाद आणि मनोरंजनामध्ये रेडिओचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे यश चित्रकूट गुरुकुलची सर्वांगीण शिक्षणाची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पलीकडे संधी उपलब्ध होतात. अशा आशादायक सुरुवातीसह, लहान आरजे अयांशने नवोदितांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे

श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिराच्या उत्सवास शोभायात्रेने प्रारंभ

मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करून आरती, विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, समाजोपयोगी कार्यक्रम नगर – छत्रपती शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड येथील श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिरच्यावतीने बालाजी उत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची नवग्रह मंदिर नालेगांव ते छत्रपती शिवाजीनगर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते मंदिरात आरती करून श्री बालाजी मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या आगोदर शोभायात्रेचा शुभारंभ माजी गटनेते संजय शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, राम नळकांडे, संदिप दातरंगे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले कि कल्याण रोड परिसरातील श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिराच्यावतीने दरवर्षी होणार्या विविध धार्मिक कार्यक्रमात परिसरातील नागरिक उत्साहाने सहभागी होत असतात. या निमित्त राबविण्यात येणारे उपक्रम हे सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. सामुदायिक विवाह हा चांगला उपक्रम राबवत आहेत, असे सांगितले. यावेळी शाम नळकांडे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी उत्सव व सर्वधर्मिय विवाह आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची शोभायात्रेने या उत्सवाची सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स, सोलो डान्स १६ फेब्रुवारी रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याच दिवशी दुपारी १२. ३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.यावेळी शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम नळकांडे म्हणाले, या उत्सवानिमित्त दररोज सकाळी ७ वा. श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई महाआरती व रुद्राभिषेक, दुपारी ४ ते ५.३० या वेळेत शिवाजीनगर महिला भजनी मंडळाचा हरिपाठ आदि कार्यक्रम होणार आहेत.या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे मित्र मंडळ व कल्याण रोड व प्रभागातील सर्व नागरिक परिश्रम घेत आहेत

विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरावे

रेहान काझी यांचे प्रतिपादन; नागोरी मुस्लिम ट्रस्ट संचलित शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी जिंकली मने नगर – शालेय जीवनात पास-नापास व कमी गुण महत्त्वाचे नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेने स्वत:ला सिध्द करावे. कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरल्यास भविष्यातील वाट सापडणार आहे. विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करुन वाटचाल करण्याचे रेहान काझी यांनी आवाहन केले. नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनिअर कॉलेज आणि एम इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. नृत्याविष्कार व नाटिकेतून कलागुणांचे सादरीकरण करुन विविध सामाजिक संदेश दिला. विविध गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. माऊली संकूल सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनाची सुरुवात कुरआन पठनाने झाली. हज कमेटीचे अध्यक्ष सलीम बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश मोरे, संस्थेचे सचिव रेहान काझी, इनाम खान, वाजिद खान, इफ्तेखार अहमद, रुमाना खान, नाजनीन शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात मुनव्वर हुसैन यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्काराची जोड देऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला. विविध गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण व सामाजिक संदेश देणार्‍या नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन लतीफ राजे, फिरदौस खान, आयेशा शेख व सबा परवीन खान यांनी केले. शाहनवाज पटेल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

अरबी समुद्रामध्ये होणार्‍या स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने होणार सहभागी

विखे पाटील फाउंडेशन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचे सहकार्य; रविवारी गाठणार १ कि.मी.चा टप्पा नगर – शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने हा विखे पाटील फाउंडेशन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून मुंबईच्या अरबी समुद्रात रविवारी (दि.१६ फेब्रुवारी) होणार्‍या सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्टेट म्युचर क्वोटिस असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत दिव्यांग गटातून सहभागी होणारा अभिजीत हा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे. अभिजीत माने याने जिल्हा व राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकाविली आहे. तो पहिल्यांदाच सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे. यासाठी त्याला विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आलेले आहे. त्याच्या सरावासह स्पर्धेचा खर्च देखील फऊंडेशनच्या वतीने उचलण्यात आलेला आहे. दिव्यांग गटातून १ कि.मी. चा टप्पा गाठायचा आहे. या स्पर्धेला रविवारी गेट ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी अभिजीतकडून मुळा डॅम आणि विळद घाट येथील विखे पाटील कॉलेजच्या जलतरण तलावात अ‍ॅकॅडमीच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून सराव घेण्यात आलेला आहे. दिव्यांगांची आई! म्हणून धनश्रीताईंचा दिव्यांगांना आधार अभिजीतच्या आईच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जलतरणाचे धडे देण्यात आलेले आहे. मात्र पुढील वाटचालीसाठी विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून धनश्रीताई विखे यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. फक्त अभिजीत नव्हे तर इतर दिव्यांग खेळाडूंना अतिशय आस्थेने व आपुलकीने प्रोत्साहन देण्याचे काम त्या करत आहे. दिव्यांगांची आई म्हणून धनश्रीताई दिव्यांगाना आधार देत आहेत. दिव्यांगांचा सर्व खर्च ते उचलत आहे. आपुलकीच्या भावनेने त्यांचे योगदान सर्व पालकांना भावनिक करत आहे, असे अभिजीतचे वडिल जगन्नाथ माने म्हणाले.

सत्याचा प्रकाश दिसण्यासाठी महामानवांचे स्मरण करणे गरजेचे

नगर – सत्याचा प्रकाश दिसावा आणि त्या दृष्टीकोनातून पावले पडावीत, यासाठी महामानवांचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित १८ व्या राज्यभरात आंतमहाविद्यालयीन . राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे हे होते. व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे, प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राज्यभरातून विविध जिल्हयातील महाविद्यालयाचे स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. देवडे म्हणाले की, कॉ. बापूसाहेब भापकर हे त्यांच्या कालखंडातील महापुरुषच होते हे त्यांनी त्यांच्या आचार, विचार आणि आदर्श व प्रेरणादायी जीवनातून दाखवून दिले. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य ही नव्या पिढीसाठी एक परंपराच आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे छोटा प्रदेश, छोटे राज्य यांच्यावर वर्चस्व असले तरी ते जगभरात पोहचू शकले हे केवळ त्यांच्या अंगभूत गुण आणि जिजाऊ मातेचा आदर्श. वक्तृत्व स्पर्धेतून चांगले वकिल घडण्याचे कार्य होते. आपल्या पक्षकाराची बाजू समर्थपणे मांडून प्रतिपक्षाचे म्हणणे खंडण करण्याची कला वक्तृतव स्पर्धेतून चांगल्या प्रकारे निर्माण होते. असे ते म्हणाले. रामचंद्र दरे म्हणाले की, बापूसाहेब भापकरांनी संस्थेच्या अनेक पदावर काम करताना बहुजन समाजासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक योगदान दिले. तसेच वकिली करत असताना समाजातील दीनदुबळयांना न्याय देताना निःस्वार्थ भावनेने वकिली व्यवसाय केला याप्रसंगी संस्थेचे सहसचिव जयंत वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना बापूसाहेब भापकर यांनी संस्थेसाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा ही एक प्रकारे विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानी असल्याचे प्रतिपादन केले. स्वागत प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी गत स्पर्धेचा आढावा घेवून स्पर्धेचा आलेख यशस्वीरित्या उंचावत असल्याचा उल्लेख केला. सुरुवातीला बापूसाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख प्रा. अतुल म्हस्के यांनी करुन दिली. सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर यांनी केले तर आभार प्रा. ए.एस. घुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविदयालयाचे अधिक्षक हेमा कदम, प्रा. अनुराधा मते, प्रा. डि. बी. मोरे, प्रा. आर. डी. भवाळ आदींनी परिश्रम घेतले

हिंदी, मराठी, धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले

आयुक्त यशवंत डांगे यांचे प्रतिपादन; महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम नगर – महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्षभर नगरकरांना सुविधा पुरवीत असताना त्यांना ताण-तणाव असतो त्यामुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. त्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांनी गीत सादर करत जीवनामध्ये आनंद घेण्याचे काम केले आहे. सर्व कर्मचार्‍यांनी एकापेक्षा एक गीत सादर केले असल्यामुळे कार्यक्रमात उत्साह पाहायला मिळाला. हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करून राज्यातील १९ ड वर्ग महापालिकेमध्ये आपली महापालिका एक किंवा दोन नंबर मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे तसेच थकीत वसुली मोठ्या प्रमाणात गोळा केल्यानंतर कर्मचार्‍यांची फरकापोटी असलेले देणे लवकरात लवकर देता येईल असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त सपना वसावा, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, कर्मचारी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, इंजिनिअर महादेव काकडे, अनिल लोंढे, राजेंद्र मेहत्रे, सतीश ताठे, किशोर कानडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी ’तुझी चाल तुरु तुरु’ हे मराठी गीत गायल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये एक प्रकारे जल्लोष निर्माण होता, वन्स मोरचा नारा दिला, तसेच उपायुक्त सपना वसावा यांनी देखील गीत गात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी सुमारे ५० कार्यक्रमाचा आनंद घेतला. मनपा कर्मचारी नितीन गोरे यांनी ’मुंबई से आया मेरा दोस्त’ हे गीत गात असताना सभागृहात एकच जल्लोष झाला व कर्मचारी यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा आनंद घेतला

अमेझिया फन फेअर मनोरंजन नगरीचे उद्घाटन

यूयॉर्क शहराची प्रतिकृती, विविध जातीचे आंतरराष्ट्रीय पक्षी पार्कमुळे मनोरंजन नगर – शहर विकास कामातून झपाट्याने बदलत असून विविध नामांकित कंपनीचे ब्रँड नगरमध्ये येत आहे. नगर शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल होत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत भर पडत असते. अमेझिया मनोरंजन नगरी महिला आणि चिमुकल्यांसाठी मनोरंजन पर्वणी ठरणार आहे. तसेच हुबेहूब साकारलेल्या न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. नगर शहरातील कल्याण रोड जाधवनगर येथे अमेझिया फन फेअर मनोरंजन नगरीचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अ‍ॅड.जयंत जाधव, वैभव ढाकणे, मयूर राऊत, निलेश हिंगे, के.एस. हँडलूमचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. आ. संग्राम जगताप म्हणाले की, पुढील एक महिना नगरकरांना विविध खेळाचा आनंद घेता येईल. जयंत जाधव यांनी नागरिकांना मनोरंजनाची एक पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. नगरकरांना आता न्यूयॉर्क शहराचा नजराना पाहिला मिळणार आहे, तसेच विविध जातीचे आंतरराष्ट्रीय पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे नगरकरांनी पण फन फेअरचा आनंद घ्यावा. येथे न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती तयार केली असून फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहे. तसेच विविध जातीचे पक्षी या ठिकाणी असून संपूर्ण परिसरामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. लहान मुलांसाठी विविध खेळण्याचे प्रकार या ठिकाणी आहे. मनोरंजनासोबतच खाद्यपदार्थाचा आस्वादही नागरिकांना घेता येणार आहे.