जामखेड – बीड रोडवरील घटना जामखेड – जामखेड शहरातील बीड रोडवर मारुती कंपनीची सीएनजी गॅस वर चालणारी
इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने कारने पेट घेतला. या अपघातात एका पोलिस कर्मचार्यासह
दोघांना आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास
घडली. या अपघातात जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल (वय ३५) व पान शॉप मालक,
महादेव दत्ताराम काळे (वय २८, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड) हे दोघे मयत झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण २४
फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारने बीड रोडकडुन जामखेड शहराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या
कारने शहरापासून एक किमी अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली. सदरची कार अत्याधुनिक पध्दतीचे असल्याने अपघातानंतर ती लगेच लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला
जात आहे. त्यामुळे कारमधील दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यातच कारने पेट घेतल्याने दोघांचाही कारमध्येच होरपळून
दुर्दैवी मुत्यू झाला. घटनास्थळी अपघात झाल्यानंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा
मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळुन आला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक
कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले. यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तातडीने जामखेड
नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आले. जामखेड नगरपरिषदेच्या आय्यास शेख, विजय
पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारुन आग आटोयात आणली.
मात्र तोपर्यंत गाडी जळुन खाक झाली होती. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे
यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ.
शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मयत महादेव काळे याचे बीड रोडवर साईनाथ पान शॉप नावाचे पानशॉप
आहे तर धनंजय गुडवाल हे जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत होते. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत