मंगलगेट येथील सेतू कार्यालय व मोबाईल शॉपी फोडणारे चौघे जेरबंद

0
191

आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलांचा समावेश, चोरीचे दोन गुन्हे आले उघडकीस

नगर – शहरातील मंगलगेट परिसरातील सेतू कार्यालय व मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. कोठला परिसरातील हॉटेल कुरेशी जवळ १० फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. अकबर लुकमान खान (वय २२) दस्तगीर हमीद शेख (वय ३५, दोघे रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह २ अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश आहे.

या बाबतची माहिती अशी की, इरफान वाहिद शेख (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या मालकीचे हॉटेल राजेंद्र शेजारी, मंगलगेट याठिकाणी असलेले सेतु केंद्र व मोबाईल शॉपी हे दुकान १५ जानेवारीला रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या बाजुचे पत्रे उचकाटून मोबाईल शॉपीत प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल सेसरीज चोरून नेल्या होत्या. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना या गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून तपास सुरु केला. पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन, आसपासचे सी.सी.टी.व्ही. फूटेज व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा अकबर खान (रा.

दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) याने त्याचे साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न केले. पथकास १० फेब्रुवारी रोजी अकबर खान हा हॉटेल कुरेशी समोर, कोठला याठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरुन कोठला येथून आरोपी अकबर खान दस्तगीर शेख व २ अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर अकबर खान याने विधीसंघर्षित बालकासोबत एक ते दीड महिन्यापुर्वी मंगलगेट परिसरामध्ये एका सिगारेट व गोळ्या बिस्कीटचे दुकानामध्ये प्रवेश करून रोख रक्कम चोरल्याची माहिती सांगीतली. तसेच २० ते २५ दिवसापुर्वी कोंड्यामामा चौक परिसरातून सेतु केंद्रामधुन रोख रक्कम व दुकानातील स्पीकर, ब्लुटुथ चोरून नेल्याची माहिती सांगीतली. चोरीच्या गुन्ह्यातील रक्कम ते आपसात वाटुन घेत असल्याची माहिती सांगीतली. आरोपीने दिलेल्या माहितीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेले २ चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेले आरोपी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हयाचे तपासकामी हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांनी केली आहे.