नगर – रुग्णालयात रोज निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या नियमालाच शहरातील काही रुग्णालये केराची टोपली दाखवत असून उघड्यावर सर्रास जैविक कचरा फेकला जात आह. परिणामी संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. शहरातील रुग्णालयातून बायोमेडिकल वेस्ट चा कचरा दररोज मोठ्या प्रमाणात निघत असून घातक असा हा कचरा काही रुग्णालयाकडून उघड्यावर टाकला जात आहे. वास्तविक महापालिकेने बायोमेडिकल वेस्टसाठी खासगी मक्तेदाराला ठेका दिला आहे असे असतानाही येथील एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सदर बाब येथील महावीर पोखरणा यांनी महापालिकेचे सावेडीचे स्वच्छता निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी श्रीराम चौकातील सदर रुग्णालयास ५००० रु.ची दंडात्मक कारवाई केली.