नगरमध्ये पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी सक्रीय

0
121

 

आनंदधाम पाठोपाठ पाईपलाईन रोडवरही वृद्धाची सोन्याची चेन व अंगठी पळविली 

नगर – पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी नगर शहर आणि उपनगरी भागात सक्रीय झाली आहे. २ दिवसांपूर्वी आनंदधाम रस्त्यावर उद्योजकाला लुटल्याची तसेच नवीन टिळक रोडवर मोपेडवर चाललेल्या महिलेचे गंठण हिसका मारून तोडून नेल्याच्या घटना ताज्या असताना, ९ फेब्रुवारीला सायंकाळी ५.४० च्या सुमारास पाईपलाईन रोडवरही रस्त्याने वॉकिंग करत असलेल्या वृद्धाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व हाताच्या बोटातील अंगठी बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत दिपक त्र्यंबक आंबेकर (वय ६७, रा. श्रीकृष्ण नगर, हॉटेल सागर समोर, पाईपलाईन रोड, अ.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आंबेकर हे ९ फेब्रुवारीला सायंकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंग करता गेले होते. पाईपलाईन रोडवर असलेल्या सुर्यकांत फर्निचर दुकाना जवळ त्यांना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसले. ते तसेच पुढे गेले असता थोड्याच अंतरावर आणखीन एका मोटार सायकलवर दोन अनोळखी रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. त्यातील एकाने आंबेकर यांना थांबून एक कार्ड दाखवून मी पोलीस आहे. तुमच्या गळ्यातील चेन व अंगठी काढून द्या असे म्हटले.

त्यावर आंबेकर यांनी तुम्ही पोलीस आहात तर माझ्या गळ्यातील सोने का मागता असे म्हटले असता त्यातील एकाने त्यांच्या पाठीमागून हाताने धक्का दिला. त्यामुळे गोंधळून आंबेकर यांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज काढून दिला. त्यानंतर लगेचच ते चारही अनोळखी इसम त्यांच्याकडील दोन मोटार सायकल वरून श्रीराम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. काही वेळातच आपण लुटलो गेलो असल्याचे आंबेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र नागरिक जमा होईपर्यंत ते चौघेही पसार झाले होते.

त्यानंतर दिपक आंबेकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी चार अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहे.

शहर परिसरात ४ दिवसांत घडल्या लुटीच्या ३ घटना

शहरातील नवीन टिळक रोडवर ६ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० च्या सुमारास मोपेड वरून घरी चाललेल्या सौ.मिनाबाई बाळासाहेब शिरसाठ (वय- ४०, रा. इधाते शाळेजवळ, भगवानबाबा नगर, सारसनगर) यांना धक्का देवून त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे १ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी बळजबरीने हिसकावून नेले होते. त्या पाठोपाठ एमआयडीसी मधील उद्योजक राजाराम राय (वय ६२) यांना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आनंदधाम रस्त्यावर मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी अडवून पोलिस असल्याची बतावणी करून तुम्ही हेल्मेट का नाही घातले? तुमचा वाहन चालविण्याचा परवाना दाखवा असे दटावले. त्यानंतर तुम्हाला कळत नाही का, या भागात किती चेन स्नॅचिंग च्या घटना घडत आहेत. तरीही तुम्ही गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या घालून फिरता. कालच या परिसरात चेन स्नॅचिंग झाली आहे. त्यामुळे तुम्ही गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा असे म्हणत त्यांना त्या काढायला लावल्या आणि त्यांची नजर चुकवून ते दागिने लंपास करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाईपलाईन रोडवर ९ फेब्रुवारीला अशीच घटना घडली आहे.

चोरट्यांनी पोलिसांनाच दिले आव्हान

पोलिस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या या टोळीने ४ दिवसांत ३ ठिकाणी आणि ते ही अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर लुटमार करत शहर पोलिसांनाच आव्हान दिले आहे. पोलिस दलाने शहरासह उपनगरात मुख्य चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या शिवाय नागरिक, व्यापारी यांचेही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी आहेत. असे असतानाही गेल्या ४ -५ दिवसांत पोलिसांना या टोळीचा काहीही तपास लागलेला नाही. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू ठरताहेत काय? किंवा पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. अशी शंका उपस्थित होत आहे. दिवसा ढवळ्या, मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी जर अशा लुटमारीच्या घटना वारंवार होत असतील तर पोलिसांचा गुन्हेगारांवर काही वचकच राहिलेला नाही असे दिसत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनीच याचा जाब शहरातील पोलिस यंत्रणेला विचारण्याची गरज आहे.