नगर मध्ये उद्योजकाला भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर लुटले सोन्याची चेन, २ अंगठ्या दुचाकीवरील दोघांनी केल्या लंपास

0
189

नगर – एमआयडीसी मधील उद्योजकाला दोघांनी भरदिवसा आणि मोठी वर्दळ असलेल्या आनंदधाम रस्त्यावर लुटल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. राजाराम राय (वय ६२, रा.एमआयडीसी, नगर) असे या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन आणि प्रत्येकी १ तोळ्याच्या सोन्याच्या २ अंगठ्या या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की उद्योजक राजाराम राय यांचा एमआयडीसी परिसरात राजलक्ष्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे अनेक ग्राहक शहर परिसरात आहेत. राय हे शुक्रवारी कामानिमित्ताने नगर शहरात आले होते व चाणक्य चौक मार्गे आनंदधाम रस्त्याने भवानीनगर येथे त्यांच्या ओळखीचे अजित कर्नावट यांच्या कडे आपल्या मोपेडवर जात होते. दुपारी १२ च्या सुमारास माजी खा. स्व. दिलीप गांधी यांच्या घराच्या समोरील बाजूस त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकल वर दोघेजण आले. त्यातील एकाने डोक्यात हेल्मेट घातलेले होते.

त्यांनी मोटारसायकल राय यांच्या मोपेडला आडवी लावून त्यांना थांबविले व पोलिस असल्याच्या थाटात त्यांना तुम्ही हेल्मेट का नाही घातले? तुमचा वाहन चालविण्याचा परवाना दाखवा असे दटावले. त्यानंतर तुम्हाला कळत नाही का, या भागात किती चेन स्नॅचिंग च्या घटना घडत आहेत. तरीही तुम्ही गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या घालून फिरता. कालच या परिसरात चेन स्नॅचिंग झाली आहे. त्यामुळे तुम्ही गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा असे म्हणत त्यांना त्या काढायला लावल्या. त्यानंतर खिशातून एक कागद काढला व यात ठेवा त्या वस्तू असे म्हणत त्यांना वस्तू कागदात ठेवायला लावल्या.

त्यानंतर तुमच्या गाडीची डिक्की उघडा असे म्हणाले. त्यामुळे राय यांनी डिक्की उघडली. त्यावेळी त्यांनी कागदाची पुडी त्यांच्या हातात देत हे दागिने डिक्कीत ठेवा आणि या परिसरातून पुढे घेल्यावर ते गळ्यात आणि हातात घाला. असे म्हणून तेथून मोटारसायकलवर निघून गेले. काही वेळाने राय यांना शंका आल्याने त्यांनी डिक्कीतील कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यात दागिन्यांच्या ऐवजी दगड होते.