आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; अभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्याख्यानाचे ऑनलाईन उद्घाटन
नगर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले. ते फक्त जगले आपल्या सर्वांच्या स्वराज्याकरिता. स्वराज्याचा ध्वज त्यांनी अखंड भारतात फडकवला. त्यांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये
कोरला गेला पाहिजे. महाराष्ट्रात विचार रुजवण्याचं काम त्यांनी केले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना पुढे
घेऊन जायचे आहे. शिवरायांच्या विचारांचे अनुसरण करत आपले सरकार राज्यकारभार चालवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे शक्तिस्थान असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने येथील कै. मा.न पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित व्याख्याना प्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवराज्याभिषेक च्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने
करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, उपप्राचार्य एस व्ही जाधव, प्रा.एस डी शिंदे, प्रा. सचिन राऊत, अभिजीत खोसे, रामदास हिराकणजी, चंद्रकांत काळोखे, रवी पंतम, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक सचिन राऊत यांनी नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार प्रसार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले त्याची प्रेरणा आपल्या अहिल्यानगर मधून मिळाली आहे. राजांचा इतिहास हा आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रेरक इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण काम केले पाहिजे. असे ते म्हणाले.
प्रा. एस डी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तंत्र प्रदर्शनात रिमोट द्वारे उद्घाटन, वायरलेस चार्जिंग सिस्टीम, एसलेटर लॉक, स्लाईड लिव्हर मेकॅनिकल जॅक अशा विविध इलेट्रॉनिक वस्तूंचे मॉडेल तयार केले होते.
सूत्रसंचालन जेई खाकाळ यांनी केले. उपप्राचार्य एस. व्ही.जाधव यांनी आभार मानले. महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन आभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांनी केलेले कार्य आजही शिखरासारखे असल्याचे सांगत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विभागातील सर्व अधिकार्यांचे त्यांनी अभिनंदनही केले





