आनंदऋषिजी म.सा. पुण्य स्मृतीदिनानिमित्त आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेतील प्रबोधन ठरले प्रभावी

0
104

राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री.आनंदऋषिजी
महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या
जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द
विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू
केलेली ही भगवान महावीर व्याख्यानमाला गेल्या ३०
वर्षांपासून शहरात वैचारिक प्रबोधन घडवण्याचे मौलिक
कार्य करते आहे.
व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक जयकुंवरबाई
मोतीलाल लोढा यांच्या स्मरणार्थ सौ. मनिषा निखिलेंद्र
लोढा आणि लोढा परिवार हे होते. सौ.मनिषा लोढा,
निखलेंद्र लोढा, सुदर्शन लोढा व सौ. संजना लोढा
यांच्या हस्ते वक्त्यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
भगवान महावीर व्याख्यानमाला सुरू झाल्यापासून
वृत्तपत्र प्रसिध्दीची सेवा निष्ठेने करणारे ज्येष्ठ साहित्यिक
पत्रकार मिलिंद चवंडके यांच्या योगदानाचाही गौरव
करण्यात आला. सौ.सरोजताई कटारिया यांचे सुरेख
सूत्रसंचालन व्याख्यानांच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधणारे
ठरले.
प्रवचनकार प्रा.डॉ.विनोद बाबर (कराड) यांनी
आजच्या व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्रामच्या जगातील
एकही जण आपल्या अडीअडचणीत – दुःखद प्रसंगात
आपल्या जवळ बसून पाठीवर हात ठेवत आधार देत
नाही की आपण हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये उपचार
घेताना आपल्या काळजीने भेटायला येत नाही.
आपल्यासाठी डोळ्यांत पाणी येणारे मोजकेच मित्र आणि
रक्ताचे नातेवाईकच आपले असतात, या वास्तवावर
बोट ठेवले.
युवा वक्ते राहुल गिरी (बीड) यांनी इयत्ता पहिलीय्दुसरीमधील मुले मोबाईल वापरतात ही अभिमानाची
वा कौतुकाची बाब नाही तर मोबाईलमुळे आपली
भावी पिढी विकलांग होणार, हे वास्तव ध्यानी घेऊन
गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.
लोककवी इंद्रजीत भालेराव (परभणी) यांनी
जळगाव जिल्ह्यातील असोदा येथील बहिणाबाई चौधरी
यांनी निरक्षर असूनही केलेल्या कविता जीवनाचे
वास्तव मांडत आत्मचिंतन करायला लावतात. या
आत्मचिंतनातून जीवनातील आनंदाची प्राप्ती निश्चितच
होते, असे सांगितले.
लेखक प्रो.नितीन लाठे (मुंबई) यांनी आपले
आई-वडिलांशी अतुट नाते कायम असले पाहिजे.
त्यांच्याजवळ जाऊन घट्ट मिठी मारता येईल असे
स्नेहबंध आई-वडिलांशी असले पाहिजेत. आजच्या
पिढीने आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची
आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले.
अतुल शहा (मुंबई) यांनी निसर्गाच्या सान्निध्यात
राहून शुध्द शाकाहार केल्यास कोणताही आजार
आपल्याजवळ फिरकूही शकत नाही, हे ठामपणे आणि
स्वानुभवातून सांगितले. स्वस्थ जीवन आणि रोग
मुक्तिचा संदेश देणार्‍या या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध
झाले.
अभिनेत्री आई तुळजाभवानी मालिकेतील
अनुभूतीची भूमिका साकारणार्‍या सौ. गौरी थोरात
(खामगांव) यांनी मुलींनो जीवनातील सुख-शांतीय्समाधान मिळवण्याकरिता स्वतःचे घरदार – गाडी
असलेला मुलगा पहाण्यापेक्षा सात्विकतेचे तेज असलेला
कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी मुलगा पती म्हणून निवडा,
असे जाहिर आवाहन उपवर युवतींना केले. हे आवाहन
उपवर मुलींना मोलाचे प्रबोधन करणारे ठरले.
शंकर महाराज शेवाळे (पुणे) यांनी तुम्ही-आम्ही
रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहात
आहेत. तीर्थंकरानंतर तीर्थंकर झाले नाहीत. रामदास
स्वामी, ज्ञानेश्वर, तुकोबा, शिवाजी महाराज परत
झाले नाहीत. रामराज्य निर्माण करण्यास प्रभू श्रीराम
परत येणार नाहीत तर त्यांचा आदर्श समोर ठेवून
आपल्यालाच रामराज्य निर्माण करावे लागणार आहे,
असे प्रतिपादन केले.
व्याख्यानमालेचा लाभ शहरासह उपनगरातील
स्त्री-पुरूषांनी घेतला. युवतींची संख्या लक्षणीय होती.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सीमा मुनोत, सपना
कटारीया, सिमरन मुनोत, संतोष गांधी, प्रतिक संचेती
आदींनी परिश्रम घेतले.