स्कीलवाले जॉब ले जायेंगे

0
41

राहुल बांगर यांचे प्रतिपादन; पेमराज सारडा महाविद्यालय येथे महाज्योती तर्फे सॉफ्ट स्कील कोर्स सुरू

नगर – भविष्यात केवळ पदवीधारक नव्हे, तर रोजगारक्षम स्किल असलेले तरुण-तरुणीच चांगल्या नोकर्‍या मिळवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महास्किल टेकचे संचालक आणि सहसंस्थापक राहुल बांगर यांनी केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात रोजगार मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात कार्यालयीन व्यवस्थापन आणि रोजगारक्षम कौशल्य या प्रशिक्षणपर अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ही संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण पदवी शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या स्वायत्त संस्थेमार्फत ग्रेस एज्युनेट व महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स राबविला जाणार आहे. विशेषतः इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटया जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यालयीन व्यवस्थापन, संवादकौशल्ये, डिजिटल कौशल्ये, नेतृत्वगुण, बायो डाटा तयार करणे आणि नोकरीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर गिरीश कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ होईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. कार्यक्रमाच्या . अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित होत्या. यावेळी महास्किल टेकचे संचालक व सहसंस्थापक राहुल बांगर, मास्टर ट्रेनर गिरीश कुकरेजा, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, संगणक विभागाचे प्रमुख  प्रा. राजेश पाटणी व प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा धर्माधिकारी मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा धर्माधिकारी यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. क्षितिजा जोशी यांनी केले. इतर महाविद्यालयांनी सदर मोफत प्रक्षीक्षणाचा  लाभ घेण्यासाठी संस्थेच्या ९०१११९३७०० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी महाज्योती, महास्किल टेक आणि ग्रेस एज्युनेट या संस्थांचे सहकार्य लाभले. सदर कौशल्य विकास अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन व्यावसायिक कौशल्यांची जोड देईल. त्यामुळे महाविद्यालयाच्या या पुढाकाराचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.