नगर – बालनाट्य ही अभिव्यक्ती व खेळनाट्य व्हायला हवीत. अश्या शिबिरांमधूनच भविष्यात लेखक, दिग्दर्शक
व अभिनेते घडतील. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्षेत्रामध्ये भरारी घेणारे, माणूसपण निर्माण करणारे, विवेकबुद्धी, प्रामाण्यवादी व विवेकशील लेखन निर्माण करून कलाकारांनी सामाजिक सांस्कृतिक आरोग्य जपले पाहिजे.
राज्य शासनाचा बालनाट्य शिबिराचा हा उपक्रम निश्चितच चांगला आहे. त्याचा योग्य उपयोग बाल कलावंतांनी आपल्या अव्यक्त प्रतिभा व्यक्त करण्यासाठी करावा आणि जास्तीत जास्त बाल रसिक तयार व्हावेत. प्रत्येकच बालकलाकार नाटक
करेलच असे नाही परंतु नाटक बालकांपर्यंत गेलं पाहिजे. विशेषता बाल रंगभूमी ही ग्रामीण भागात रुजू व्हावी व वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी केले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे, पी. डी. कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, शिबीर संचालक ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पी. डी. कुलकर्णी आणि प्रा. प्रसाद बेडेकर यांनी मनोगतातून शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिबिराथींनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शिबीर संचालक अनंत जोशी, समन्वयक सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे, बाल रंगभूमी परिषदेचे सचिव प्रसाद भणगे, नाट्यकर्मी अविनाश कराळे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करण्यात आलेले बालनाट्य प्रशिक्षण शिबीर १७ ते २६ मार्च या १० दिवसांच्या कालावधीत सावेडी उपनगरातील माऊली सभागृहाच्या बेसमेंट हॉल होणार आहे. शिबिराचा समारोप शिबिरात सहभागी झालेल्या बालशिबिराथींना घेऊन बालनाट्य प्रयोग २७ मार्च रोजी माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सादर होणार आहे. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे शिबीर संपूर्णतः निशुल्क या उपक्रमात मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.