शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लुटणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीतील आणखी दोघे पकडले

0
104

१२ लाख ९२ हजाराची रोकड, एक कार, तीन मोबाईल हस्तगत, सायबर पोलिसांची कारवाई

नगर – शेअर मार्केटमध्ये
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून
गुंतवणूकदारांची फसवणूक
करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा
पर्दाफाश करणार्‍या सायबर
पोलिसांनी याच टोळीतील
आणखी दोघांना अटक केली
आहे. यापूर्वी चौघांना अटक केली
होती. दरम्यान, संशयित आरोपी
हे परदेशी गुन्हेगारांच्या मदतीने
नागरिकांची आर्थिक फसवणूक
करत असल्याचे समोर आले आहे.
राजेश राठोड ऊर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, जि.
नागौर, राजस्थान) व दीपककुमार घनशामभाई जोशी (रा. वसंत
विहार, सोलापूर, मुळ रा. चाणस्मा, जि. पाटणा, गुजरात) अशी
अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १२ लाख
९२ हजाराची रोकड, एक कार, तीन मोबाईल हस्तगत करण्यात
आले आहेत.
२७ जानेवारी २०२५ रोजी शेंडी (ता. नगर) येथील
रहिवाशी आयटी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केट
ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिषाने १ कोटी १० लाख
८० हजार रूपयांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद दिली होती.
फिर्यादीनंतर सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण
केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या तपासणीअंती चौघांना
अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून राजेश राठोड
उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग याचा या फसवणुकीत महत्त्वाचा सहभाग
असल्याचे समोर आले. तो कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून
पैसे परदेशात पाठवण्याचे काम
करत होता. पोलिसांनी त्याला
अटक केली.
दरम्यान, राजेंद्रच्या
चौकशीतून या आर्थिक
फसवणुकीत चीनमधील
नागरिकांचा सहभाग असल्याचे
निष्पन्न झाले. या टोळीने भारतीय
चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये
रूपांतरित करून ते कंबोडियामध्ये
पाठवले होते. राजेंद्रच्या माहितीच्या
आधारे हवाला नेटवर्कव्दारे पैसे
हस्तांतरित करणार्‍या दीपककुमार जोशी यालाही अटक करण्यात
आली. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक योगेश
चाहेर, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल
हुसळे, अरूण सांगळे, मोहम्मंद शेख, नीलकंठ कारखेल, दिगंबर
कारखेल, मल्लिकाअर्जुन बनकर, दिपाली घोडके, सविता खताळ,
प्रितम गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
नागरीकांना सायबर पोलिसांचे आवाहन
संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर मार्केटमध्ये
मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच
गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपले बँक
खाते किंवा कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे, अन्यथा
मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते असे सायबर
पोलिसांनी म्हटले आहे.