शिवजयंती मिरवणुकीत नथुराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक नगरमध्ये पोलिसांनी केला एकावर गुन्हा दाखल, इतरांचा कसून तपास सुरु

0
112

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर शहरात १९ फेब्रुवारीला सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकवण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील गँगस्टर बिश्नोईचा फलक झळकवणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतरांचा कसून शोध सुरु आहे.

ओंकार बाळासाहेब धारूरकर (रा. सोनार गल्ली, कर्जत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिवजयंती निमित्त अहिल्यानगर शहरात १९ फेब्रुवारीला सायंकाळी डीजेच्या दणदणाटात ५ मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यातील पैलवान प्रतिष्ठान या मंडळाची मिरवणूक तख्ती दरवाजा येथे आली असता त्या मिरवणुकीत एका तरुणाने खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो असलेला फलक झळकावला. त्या फलकाच्या पाठीमागे जिहाद्यांचा बाप असा मजकूर असलेला मंत्री नितेश राणे यांचाही फलक होता. सदरची दृश्ये प्रसार माध्यमांच्या द्वारे प्रसारित झाली. सोशल मिडीयावर ती व्हायरल झाली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सदर फलक झळकवणाऱ्याचा शोध घेतला असता तो ओंकार बाळासाहेब धारूरकर हा असल्याचे समोर आले.

त्यामुळे कोतवाली पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी २० फेब्रुवारीला रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ओंकार धारूरकर याच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीच्या आकृती किंवा त्याचे प्रतिमाचे प्रदर्शन करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला असतानाही त्या आदेशाचा भंग करत विनापरवानगी खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील  कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकविल्या प्रकरणी भारतीय नागरी संहिता कलम २२३ सह मुंबई पोलीस अधिनियम ३७  (१) (ड) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या मिरवणुकीत आणखी एका मंडळापुढे नाचताना एकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो असलेला फलक झळकविलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला असून पोलिस त्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

गुन्हेगारांचे फोटो नाचवणारांना तात्काळ अटक करा

शिवजयंती मिरवणुकीत महात्मा गांधी यांचा खुनी देशद्रोही नथुराम गोडसे व कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांचे फोटो नाचणाऱ्या गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. या राज्यामध्ये गुन्हेगारांचे हातपाय कलम केले जायचे, टकमक टोकावरून फेकून त्यांना देह दंडाची शिक्षा दिली जायची अथवा हत्तीच्या पायाखाली दिले जायचे. रयतेच्या हिताचे लोक कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. अशा या महान राजाच्या जयंती दिवशी शहरामध्ये महात्मा गांधी यांचा खून करणारा गोडसे व कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे पोस्टर नाचवून त्यांचे उदात्तीकरण केले आहे.

खरे तर कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. कायदा व सुव्यवस्था व पोलिस यांना चॅलेंज करण्यासारखे आहे.तरी सदर बाब ही अत्यंत गंभीर असून अहिल्यानगर शहराची सांस्कृतिक वाटचाल आता गुन्हेगारांचे उदात्तिकरण करणारे शहर अशी होत आहे. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन सदर गुन्हा करणारे आरोपी यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी टिळक भोस यांनी केली आहे.