अकोळनेर येथे होत असलेल्या हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्यानिमित्त सरपंच प्रतिक
शेळके यांना मानाचे श्रीफळ देताना देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष रामदास महाराज
मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, वंशज अनिकेत महाराज मोरे, माऊली महाराज कदम
नगर – संतश्रेष्ठ तुकोबांच्या वैकुंठ गमनाला सन २०२४ – २५ दरम्यान ३७५
वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संतकवी दासगणू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या
अहिल्यानगर तालुयातील अकोळनेर गावाला अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा
पारायण सोहळ्याचा मान मिळाला आहे. या ठिकाणी १६ ते २३ एप्रिल या कालावधीत
हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार असल्याची माहिती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम
(छोटे माऊली) यांनी दिली.
या सोहळ्याच्या नियोजनाची बैठक अकोळनेर येथे पार पडली यावेळी देहू येथील
संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष रामदास महाराज मोरे, विश्वस्त भानुदास
महाराज मोरे, वंशज अनिकेत महाराज मोरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि आष्टी
तालुयातील सुमारे १०० गावांमधील भजनी मंडळे, प्रमुख पदाधिकारी यांना मानाचे
श्रीफळ दिले.
श्रीक्षेत्र देहु येथून हेलिकॉप्टरद्वारे आणणार तुकोबारायांच्या पादुका अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये सांगताना
माऊली महाराज कदम म्हणाले, या धर्मसोहळ्यास १५ एप्रिल रोजी श्री जगद्गुरु तुकोबाराय
पादुकांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्यात हेलिकॉप्टरद्वारे श्रीक्षेत्र देहु येथून अकोळनेर
येथे आणण्यात येणार आहे. तसेच श्री क्षेत्र देहू येथून अकोळनेर येथे १०८ तरुणांच्या
हस्ते ज्ञानज्योत आणण्यात येणार आहे. या दिव्य पादुकांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार
आहेत. या दिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत दिव्य पादुका आणि ज्ञान ज्योत यांची भव्य
शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलश धारी, ३७५
तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक, ३७५ ब्रम्हवीणाधारी,
३७५ चोपदार असणार आहेत. शोभायात्रेनंतर धर्मध्वजारोहण होणार आहे.
५ हजार वाचकांचे भव्य दिव्य संगीत गाथा पारायण
१६ एप्रिल पासून अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सुरु होईल. या काळात
दररोज ५००० वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे.
भारतातील प्रमुख चार पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित
करण्यात आले आहे. तसेच राज्यातील मान्यवर देवस्थानचे मठाधिपती यांनाही निमंत्रित
करण्यात आले आहे.
१ लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन देणार
अखंड हरिनाम सप्ताहमध्ये ५०० गावांचा २४ तास तुकाराम नावाचा अखंड भजन
पहारा गजर होणार आहे. दररोज ५०० टाळकरी व २५ मृदंग वादक कीर्तन सेवा देणार
आहेत. या काळात दररोज ५० हजार भाविकांना आमटी भाकरीचे अन्नदान करण्याचे
उद्दिष्ट असून २३ एप्रिल रोजी १ लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन देण्यात येणार
आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार
आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच इतया मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार
असल्याने भाविकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री जगद्गुरु तुकोबाराय
त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आलेले
आहे