नगर – नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाबाहेर दोन रिक्षा चालकांमध्ये सोमवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकाने तर रिक्षावर दगड फेकून मारत रिक्षाच्या काचा फोडल्या. या मध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकासमोरील हॉटेल फेमस जवळ असणाऱ्या रिक्षा स्टँडवर हा प्रकार घडला. रिक्षाचालक मुद्दसर शकील शेख (रा. सदर बाजार, भिंगार) आणि वसंत मोकाटे (रा. हनुमाननगर, दौंडरोड)यांच्यामध्ये वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन त्यानंतर हाणामारीत झाले. यावेळी मुद्दसर शेख याने वसंत मोकाटे यांना कुठल्या तरी टणक वस्तूने मारहाण केल्याने मोकाटे हे रक्तबंबाळ झाले होते. तर त्यांच्या रिक्षावर (क्र. एमएच १६ बी सी ३३१३) मुद्दसर याने मोठमोठाले दगड फेकून मारले. त्यामुळे रिक्षाच्या काचा फुटून या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी दगडांचा साठा, काचेचे तुकडे आढळून आले. शेख आणि मोकाटे यांच्यामध्ये नेमका कोणत्या विषयावरून राडा झाला. घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. दोन दिवसांपूर्वीही या दोघांमध्ये वाद झाले होते, असे तेथील एका व्यावसायिकाने सांगितले. या प्रकरणी वसंत मोकाटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. दुपारी उशिरापर्यंत मोकाटे यांची फिर्याद घेण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरु होते.