सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर चालू, पहिला पेपर मास्टर प्लॅन नुसार सुरळीत
नगर – नगर जिल्ह्यात १०९ केंद्रांवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला ११ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली. परीक्षेसाठी जिल्ह्यात ६३ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. परीक्षा केंद्रावरील सरसकट शिक्षक, शिक्षकेतर आणि परिचर यांच्या आदला-बदल करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर असून गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येत आहे.
परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दक्षता समितीची बैठक घेवून महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेर्याची नजर असणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणार्यांवर ड्रोन कॅमेर्यांचा वॉच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे वेब कास्टिंग द्वारे परीक्षेचे अपडेट घेत असून महत्त्वपूर्ण सूचना प्रसारित करीत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेब कास्टिंग होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा ,सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेब कास्टिंग आदी व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून दक्षता समिती सदस्य वेब कास्टिंगची मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर करत आहेत. काही मिनिटांच्या ठराविक कालांतराने वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी वार रूमला भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांचे ‘लक्ष’
ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला आहे. १० वी व १२ वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांनी परीक्षा सुरू होताच विविध पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी – योजना), पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे, श्रीराम थोरात आदी समिती सदस्य जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नकारात्मक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
गैरमार्गाची प्रकरणे निरंक करण्यासाठी अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे.
तर परीक्षा केंद्र व शाळेची मान्यता होणार रद्द
कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे, गैरप्रकारात सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द, परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टींग मॉनिटरींग, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे दोन स्तर, मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच, सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणार, जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक, संवेदनशिल केंद्रावर जास्त बंदोबस्त, राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून जिल्हाभरात ही पथके कार्यरत झाली आहेत.