आईस्क्रीमचा शोध कोणी लावला?
रणरणत्या उन्हात घामाच्या धारांवरील एकमेव जालीम उपाय म्हणजे कोनाच्या सर्वबाजूंनी ओळघणारे आईस्क्रीम. तापमानाचा पारा चढलेला असताना आपल्याला हा थंडगार खाद्यपदार्थ चाखावासा वाटतोच, पण कुडकुडणार्या थंडीतही या पदार्थाचा आनंद ज्यांनी लुटला असेल ते खरे आईस्क्रीमचे चाहते. निमित्त काहीही असो, शेवट गोड करायचा असेल तर आईस्क्रीमलाच पसंती दर्शवली जाते. आईस्क्रीमच्या इतिहासात डोकावायला गेल्यास तब्बल २५०० वर्षे मागे जावे लागते. आता आपण खात असेलेल्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी वेगळे आईस्क्रीम पहिल्यांदा प्राचिन पर्शियामध्ये बनवले गेले. गोड चवीच्या पाण्याच्या बर्फाचे तुकडे करून त्यावर वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आणि फळांनी ते सजवलं जात असे. आईस्क्रीम बनवण्याची ही पद्धत हळूहळू रोमन आणि ग्रीक साम्राज्यातही पोहोचली. खरंतर आईस्क्रीम बनवण्याची प्रक्रिया फारच खर्चिक होती. परंतु तिथल्या राजांनी अतिशय खुल्या मनाने या पदार्थाचे स्वागत केले आणि त्यांच्याकडे असलेल्या मुबलक संपत्तीच्या जोरावर त्याला मानाचं स्थान प्राप्त करून दिलं. पुढे रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर शिखरांवरून शहरात येणार्या बर्फाची वाहतूक बंद झाली आणि मग आईस्क्रीम बनवणं आणि खाणं ही खर्चिक बाब बनली. इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला आपल्या आईस्क्रीम पाककृतीला उर्वरित इंग्लंडपासून गुप्त ठेवण्यासाठी खानसाम्याला प्रतिवर्षी ५०० पौंड देत होता, असे सांगितले जाते. मार्को पोलो (१२५४ १३२४) या प्रवाशाने आपल्या चीनच्या दौर्यात आईस्क्रीम तयार करून इटलीला आणल्याचे पुरावे सापडतात. परंतु, पर्शियाप्रमाणेच चीनमध्येही इसवी सन पूर्व २०० च्या आसपास दूध आणि भाताचे गोठवलेले मिश्रण याच काळात जन्माला आले होते. त्यामुळे आशिया खंडासाठी आईस्क्रीमचा समावेश कधीच आयात केलेल्या पदार्थांच्या यादीत नव्हता. १३ व्या आणि १४ व्या शतकात, इटली हे मध्य पूर्वेकडील देश आणि आशियासाठी व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे तेथे येणार्या व्यापार्यांमार्फत आईस्क्रीम युरोपातील वेगवेगळ्या देशात पोहोचण्यास मदत झाली. असं असलं तरी, आईस्क्रीमचा विस्तार फार सोपा नव्हता. १५३३ मध्ये इटलीची कैथरीन डीमेडीसी ही फ्रान्सच्या ड्यूक डी ऑर्लीन्स (फ्रान्सचा भावी राजा) याच्याशी विवाह करण्यासाठी फ्रान्सला गेली. तिथे तिने पूर्वेकडील आश्चर्यकारक गोष्टींसोबत युरोप खंडातील खानदानी गोष्टींची ओळख करून दिली. त्यामध्ये जेवणाची वेगळी भांडी, उंच टाचांचे बूट आणि अर्थातच आईस्क्रीम यांचा समावेश होता. पुढे नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि प्रयोगांच्या माध्यमातून आईस्क्रीमला लोकप्रियता प्राप्त झाली. उत्तर अमेरिकेत मात्र आईस्क्रीमच्या विक्रीला औद्योगिक क्रांतीनंतर आणि इंग्लंड व फ्रान्सच्या मागोमाग सुरूवात झाली. पण सगळीकडे आईस्क्रीमला दीर्घकाळासाठी गोठवून ठेवणे ही समस्या कायम होती. या समस्येचे निराकरण होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. १९२६ साली इलेट्रीक फ्रिझरचा शोध लागला आणि हव्या त्या क्षणी गारेगार आईस्क्रीम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली.