कानात तेल टाकावे की नाही?
कानात तेल टाकण्याची आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रथा आहे. बाळाला तेल चोळून आंघोळ घालण्यासोबतच कानात, नाकात, तेल टाकले जाते. आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यासाठी दिवसभर काय करायचे हे सांगतांना कानात तेल टाकणे हा उपक्रम दिलेला आढळतो. कानाच्या आजारांवर सुद्धा औषधी तेलांचा उपचार सांगितलेला आढळतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेले अनेक उपचार आपल्या सणावारांमध्ये, उपवासाच्या पद्धतीत, आपल्या चालीरीती आहेत. त्यामध्ये गुंफून टाकलेले दिसून येतात. कानात तेल टाकणे, हा त्यातीलच एक उपचार आहे. कान दुखत असल्यास, कानात मळाचे खडे झाल्यास तेल कोमट करून (लसूण तेलात टाकून, ते उकळून, कोमट करून) टाकले जाते. हा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच. परंतु प्रत्येक वेळेस कानदुखी या उपायाने थांबेलच असे नाही. कारण कानदुखीची अनेक कारणे असतात.
कोमट तेलाने शेकल्याने बरे वाटू शकते; पण मध्यकर्णातील, हाडातील आजारांमुळे कानदुखी असेल तर त्याने थांबत नाही. कानातील मळाचे खडे तेलाने पातळ होऊन काढायला सोपे जाते; परंतु तेल घातल्याने जंतुसंसर्ग कानाच्या आतपर्यंत पोहचून आजार अधिक गंभीर होऊ शकतो. तेल जर जंतुविरहित नसेल, तर कानाला सूज येऊ शकते. तेलाद्वारे बुरशी कानापर्यंत जाऊन तेथे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बाळाच्या कानात तर तेल न टाकलेलेच चांगले. वरील विवेचन पाहिल्यावर आपण तेल वापरताना ते स्वच्छ, उकळवून जंतुविरहित केलेलेच वापरावे आणि कान खूप ठणकत असताना, फुटून पू येत असेल त्यावेळेस, कान खूप खाजत असताना तेल वापरू नये. अशा वेळेस नाक, कान, घसा तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.