केस कापताना दुखत नाहीत पण ओढल्यावर दुखतात?

0
94

केस कापताना दुखत नाहीत पण ओढल्यावर दुखतात?

सलूनमध्ये कटींगला गेल्यानंतर तुमच्यापैकी सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला असेल. न्हावी सराईतपणे त्याची कात्री तुमच्या केशसंभारावर चालवत असतो आणि बिचारे (!) केस धारातीर्थी पडत असतात. पण लहानपणी तुम्ही डोके हलवत असाल आणि त्यामुळे केस ओढले जाऊन तुमच्यावर ‘आईऽऽगं’ असा चित्कार काढण्याची वेळ नक्कीच आली असेल. केस कापताना दुखत नाहीत, पण ओढल्यावर दुखतात; याचा अनुभव तुम्ही घेतलाच आहे, असे का होते ते पाहू. त्वचेतून केस बाहेर येतो. केस वाढण्याच्या अवस्थेतील न वाढ थांबलेले असे दोन प्रकार असतात. डोयाच्या एक लाख केसापैकी सुमारे १० टक्के केस वाढ थांबलेल्या प्रकारचे वा जणू ‘विश्रांती’ घेणारे केस असतात. त्वचेचे बाह्यत्वचा व अंतःत्वचा असे दोन भाग असतात. बाह्यत्वचेमध्ये पेशींचे पाच थर असतात. मात्र बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठाही नसतो आणि मज्जातंतूही नसतात. पोषण आणि संवेदना यांसाठी हा थर अंतःत्वचेवरच अवलंबून असतो.

अंतःत्वचा जोडपेशी आणि सूक्ष्म तंतूमय भाग यांनी बनलेली असते. यात रक्तप्रवाहासाठी केशवाहिन्यांचे जाळे, संवेदनेसाठी मज्जातंतू आणि घाम निर्माण करणारी केशमुळे असतात. त्वचेच्या बाहेर दिसणारा केस हा या केशमुळातूनच बाहेर पडलेला असतो. केसाचे मूळ, खोड व टोक असे तीन भाग असतात. केसाच्या बाहेरच्या भागात केरॅटीनचा गोलाकार थर असतो. त्याच्या आतील भागात केरॅटीनचे उभे तंतू असतात व येथेच केसांचा रंग ठरवणारे रंगद्रव्य असते. सर्वात आतील थर खूप अरूंद असतो व कधीकधी नसतोच. वरील वर्णनावरून तुमच्या लक्षात येईल की, केसाच्या अंतःत्वचेमधील भागातच (केशमूळ) जिवंत पेशी असतात. तसेच अंतःत्वचेतच मज्जातंतूही असतात. बाह्यत्वचा वा त्या बाहेरील केसांमध्ये सजीव पेशी नसतात आणि मज्जातंतूही नसतात. साहजिकच केस कापल्यानंतर दुखत नाहीत. पण ओढल्यास केशमुळाला धक्का बसतो व त्याभोवतीच्या मज्जातंतूमुळे केस दुखतात.