काही लोक झोपेत का चालतात?
झोपेत चालणार्यांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. झोपेत बडबडणारे खूप असतात. त्यामानाने झोपेत चालणार्यांचे प्रमाण बरेच कमी असते. मोठ्या माणसांपेक्षा मुलांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी व्यक्ती झोपेतच उठते. घरात फिरते वा घराबाहेर पडून अनेक ठिकाणी जाऊ शकते. स्वतःला इजा करण्याची शयता मात्र फार कमी असते. अर्थात अपघात होऊ शकतात. खरेच का अशी व्यक्ती झोपलेली असते? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. ही व्यक्ती जागी नसतेच. पण झोपलेलीही नसते! ती मधल्याच कोणत्यातरी भ्रमिष्ट अवस्थेत असते. अशा वेळी व्यक्तीच्या मेंदूच्या कार्याचा आलेख तपासला, तर तो झोप वा जागेपणा या दोन्हींच्या सामान्यपणे आढळणार्या आलेखांपेक्षा वेगळा असल्याचे लक्षात येते.
गमतीची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता इतकी एकाग्र होऊ शकते की, दिवसभर न सुटलेले एखादे गणित ती व्यक्ती अशा अवस्थेत सोडवू शकते. वाईट म्हणजे अशा अवस्थेत ती व्यक्ती चोरी वा खूनही करू शकते. झोपेतून उठल्यावर मात्र त्या व्यक्तीला केलेल्या कृत्याबद्दल काही स्मरण नसते. साहजिकच बरेचसे गुन्हेगार शिक्षा टाळण्यासाठी झोपेत चालण्याचा विकार असल्याचे नाटक करतात; पण परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्यांच्या दाव्याची शहानिशा करता येते. झोप आपल्याला खूप आवश्यक असते. थकलेले शरीर झोपेनंतर ताजेतवाने होते; पण काही मनोविकारात वा इतर रोगांमध्ये झोपेवर परिणाम होतो. झोपेत चालण्याचा प्रकारही आढळून येतो. अशा व्यक्तीना मानसोपचाराचा उपयोग होऊ शकतो.