पानात काहीतरी खायला देऊन, व्यक्तीजवळच्या वस्तू, चोर लांबवतात; हे खरे आहे काय?

0
72

पानात काहीतरी खायला देऊन, व्यक्तीजवळच्या वस्तू, चोर लांबवतात; हे खरे आहे काय?

रेल्वेत शेजारी दोन-तीन लोक येऊन बसतात, ओळख होते व गप्पा रंगतात. नंतर यात्रेला गेल्याचे सांगून ते लोक प्रसाद खायला देतात किंवा विडा खायला देतात. नंतर तुमच्याजवळचे सामानसुमान चोरून पलायन करतात. अशा बातम्या वृत्तपत्रात तुम्ही वाचल्या असतील. खरेच असे होते का? काही विषपदार्थ असे आहेत की जे वर उल्लेखल्याप्रमाणे वापरले जातात. धोतर्‍याचे झाड तुम्ही पाहिले असेल. हे झाड विषारी असते, पण त्यातही फळ व बिया जास्त विषारी असतात. या बियांमध्ये लिव्होहायोसॅमीन, हायोसीन वा स्कोपोलामीन तसेच अ‍ॅट्रोपीन नावाचे घटक असतात. बिया व फळे खाल्ल्याने व्यक्ती हाडासारखी शुष्क, बीटासारखी लाल, गरम व भिजवलेल्या कोंबडीसारखी वेडपट बनते; असे गमतीने म्हटले जाते. या विषबाधेत घसा व तोंड कोरडे पडते, बोलता येत नाही, गिळता येत नाही, बुब्बुळे मोठी झाल्याने नीट दिसत नाही, माणूस दारू प्यायल्यासारखा चालतो, झोपाळू बनतो, विचित्र वर्तन करतो. १०० ते १२५ बिया खाल्ल्यास प्रौढ व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. वर उल्लेखलेली लक्षणे पाहिल्यावर चोर याचा का उपयोग करत असतील हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. पानातून, खाद्यपदार्थातून वा द्रवपदार्थातून या बियांची पावडर दिल्यास त्या व्यक्तीत उपरोक्त लक्षणे दिसून येतात. त्यांच्या जवळच्या वस्तू पळवणे मग खूप सोपे असते. बरं, त्यानंतर त्यांना धड सुसंबद्धपणे काही बोलू शकत, ना नीट चालू शकत. क्वचित प्रसंगी दारू प्यायलाय असे वाटून लोक वा पोलीसही त्याच्याकडे दुर्लक्षच करतात. म्हणूनच हुशार चोर या विषाचा वापर करतात व पलायन करतात. अशा विषबाधेमध्ये पोटात गेलेले विष उलट्या करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. दवाखान्यात नळीने पोटात पोटॅशियम परमँगनेट वा टॅनिक अ‍ॅसिड टाकून नंतर पोटातील विष त्याच नळीने बाहेर काढले जाते. निओस्टीग्मीनसारखे विशिष्ट औषधही उपयोगी ठरते. आता लक्षात आले का, आई-बाबा असे का सांगतात की, प्रवासात कोणी काही दिले तर खाऊ नका ते?