‘तोंड येते’ म्हणजे काय?

0
37

‘तोंड येते’ म्हणजे काय?

बर्‍याचदा आपण अनुभवले असेल की, एखाद्या आजारानंतर (जसे ताप येणे, पोटांचे आजार, हगवण, आमांश इ.) तोंड येते. यावेळेस जीभ लाल होते, कधीकधी फोड येतात. जिभेस, तोंडाच्या आतील त्वचेला तिखट लागू देत नाही. कधी कधी तर कुठलाही स्पर्श या फोडांना सहन होत नाही. हे तोंड येणे म्हणजे जिभेचा दाह होणे होय. जीभ किंवा तोंडाच्या आतील त्वचेचे बळ कमी झाल्याने त्या त्वचेला दाह होतो. याचे मुख्य कारण म्हणजे ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव होय. एखाद्या आजारपणानंतर जीवनसत्त्वाचा अभाव होऊन तोंड येते. तसेच सतत चहा पिणे; तंबाखू, पानमसाला, विडी, सिगारेट यांचे अतिसेवन; पानमसाला, तंबाखू, सुपारी तोंडात ठेवून चघळत राहणे; यांमुळेही तोंड येते. आमांश, जंत, आतड्यांच्या आजारात आतड्यातून अन्नाचे शोषण योग्य न झाल्याने देखील ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन तोंड येते.

बद्धकोष्ठाचा त्रास असणार्‍या व्यक्तींमध्येही वारंवार तोंड येते. तोंडात, जिभेवर असे वारंवार फोड येणे; पांढरे चट्टे पडणे, हे पांढरे चट्टे तसेच राहणे, अशी लक्षणे असतील तर त्या ठिकाणी पुढे कॅन्सर होण्याची शयता असते. पान, तंबाखू, सुपारी चघळणार्‍या व्यक्तींमध्ये विशेषतः असे होण्याची शयता असते. वरील अनेक कारणांपैकी कुठल्या कारणांमुळे तोंड येते आहे ते पाहून उपाययोजना करतात. या चिकित्सेमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या; जंत, आमांश यावर उपचार आणि तंबाखू, सुपारी चघळणे, अतिशय तिखट-मसालेदार अन्न या घातक सवयींपासून दूर राहणे अशा गोष्टींचा उपायांमध्ये समावेश होतो. आयुर्वेदामध्ये तोंड आल्यावर जाईची पाने चघळणे असा एक उपाय सांगितला आहे. ही पाने स्वच्छ धुऊन थोडीथोडी चावत, चघळावीत व याचा रस जीभ, गालाच्या आतील भागात लागेल असे चघळावे. हा रस गिळला तरी चालते.