पेरूचे पंचामृत
साहित्य – एक किलो मोठे पेरू, अर्धी
वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, एक वाटी ओले
खोबरे, बारा-पंधरा हिरव्या मिरच्या, पंधरा
वीस कढीलिंबाची पाने, दोन मोठे चमचे चिंचेचा
कोळ, अर्धी वाटी गूळ, चवीला मीठ, हवे
असल्यास तिखट, एक चमचा गोड मसाला,
अर्धी वाटी काजूचे तुकडे, फोडणीसाठी अर्धी
वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी
पूड.
कृति – पेरूच्या बिया काढून फोडी
कराव्यात. बियांचा भाग थोडे पाणी घालून
शिजवून घ्यावा. कुस्करून किंवा हलकेच
मिसरमधून काढून गाळून घ्यावा आणि बिया
फेकून द्याव्या. खोबरे, गूळ, कढीलिंबाची
पाने एकत्र करून थोडे पाणी घालावे आणि
बारीक वाटून घ्यावे. तेलाची फोडणी करावी.
फोडणीत मेथी पूड आणि दहा-बारा मिरच्या
बारीक चिरून घालाव्या. काजूचे तुकडे घालून
परतून घ्यावे. मग चवीला मीठ, चिंचेचा कोळ,
पेरूचा गर, वाटलेले खोबरे घालून एक-दोन
मिनिटे उकळू द्यावे. मग पेरूच्या फोडी घालून
एक-दोन मिनिटात पंचामृत खाली उतरवावे.