‘तोफखाना’ हद्दीत घरफोड्यांपाठोपाठ वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

0
77

 

एकाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणाहून ३ दुचाक्या गेल्या चोरीला

नगर – नगर शहरातील उपनगरी भागाचा समावेश असलेल्या तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु असताना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोर्‍याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शनिवारी (दि.८) एकाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून ३ दुचाकी वाहने चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून चोरीचे गुन्हे दाखल केले जात असले तरी त्या गुन्ह्यांची उकल करण्यात तोफखाना पोलिस अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सावेडी नाका परिसरात सध्या फन फेअर चालू असून ते पाहण्यासाठी गेलेल्या एकाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. एम.एच.१६ बी ए ७६२९) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० या कालावधीत घडली. याबाबत विशाल चंद्रकांत गलांडे (रा.धर्माधिकारी मळा, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना सावेडी नाका येथील फन फेअर सुरु असलेल्या मैदानातच शनिवारी (दि.८) रात्री ९.३० ते ९.५० या कालावधीत घडली. येथून प्रीतम कडू जगताप (रा.दत्त नगर श्रीरामपूर) यांच्या मालकीची हिरो कंपनीची एच एफ डिलस मोटारसायकल (क्र. एम.एच.१७ सी के ७५०२) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चोरीची तिसरी घटना दिल्लीगेट परिसरातील घोरपडे हॉस्पिटल समोरील पटांगणात घडली. या परिसरात राहणारे विशाल वसंत सावेकर यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनीची एच एफ डिलस मोटारसायकल (क्र. एम.एच.१६ बी एस ०३८५) अज्ञात चोरट्याने शनिवारी (दि.८) रात्री ९.३० ते रविवारी (दि.९) सकाळी ६.३० या कालावधीत घडली. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल करण्याचे केले रेकॉर्ड

तोफखाना पोलिस ठाण्याने या वर्षी गेल्या ५ महिन्यात जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत सर्वाधिक गुन्हे दाखल करण्याचे ’रेकॉर्ड’ केले आहे. १ जानेवारी पासून ९ जून पर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. एवढे गुन्हे दाखल झाले असल्याने सर्वाधिक गुन्हेगारी तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, हाणामार्‍या, विनय भंग, अत्याचार या गुन्ह्यांसोबतच अवैध धंदे ही मोठ्या प्रमाणात या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे.

’डी बी’ पथकाच्या ’भलत्याच’ कामगिरीची चर्चा

पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यासाठी पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथके नेमण्याची परंपरा आहे. तसे पथक तोफखाना पोलिस ठाण्यातही नेमलेले आहे. या पथकाच्या प्रमुख पदाची धुरा मध्यंतरी एका उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी या ठिकाणी बदलून आलेले पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पदभार घेतल्यावर काही दिवसांतच त्या अधिकार्‍याची भलतीच कामगिरी पाहून त्याची डी बी पथकातून हकालपट्टी केली. आता या हे पथक थेट पो.नि. कोकरे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. मात्र हे पथक गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी भलताच शोध घेत फिरत असते अशी उघड चर्चा सध्या पोलिस दलात सुरु आहे. त्यामुळेच दाखल गुन्ह्यांची उकल होत नसल्याचेही बोलले जात आहे.