निवडणूक निकालानंतर शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांना मोठा फटका

0
25

सेन्सेस आणि निफ्टीत नोंदवली गेली आतापर्यंतची उच्चांकी घसरण

मुंबई – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली होताना दिसत आहे. सेन्सेस तब्बल ५,४०० अंकांनी कोसळला तर निफ्टीनेही १५०० अंकांची मोठी घसरण नोंदवली. सेन्सेस आणि निफ्टीतील ही घसरण आतापर्यंतची उच्चांकी असून यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आघाडीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा मिळत असल्याचे समोर आल्यानंतर घसरण आणखी तीव्र झाली आणि बाजारात हाहाकार माजला. दिवसाच्या सुरुवातीला झालेली पडझड वाढत जाऊन सेन्सेस तब्बल ५,४४० अंकांनी आपटला. बँक निफ्टीमध्ये ७ टक्के हून अधिक घसरण झाली असून यामध्ये बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स टक्के घसरले. याशिवाय देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सही १५ टक्के घसरले. त्याचवेळी, बंधन बँक आणि इंडसइंड बँकेच्या समभागांना १० टक्के नुकसान सहन करावे लागत आहे.

’गुंतवणूकदारांकडून विक्रीचा दबाव

शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढतच असून सेन्सेस ७१,५०८ अंकावर घसरला तर निफ्टी १,४४० अंकांनी घसरून २१,८७१ अंकांवर आला आहे. पीएसयु बँक समभाग १५ टक्के आणि मेटल शेअर्स १० टक्क्यांनी घसरले असून या प्रचंड घसरणीतही हिंदुस्थान युनिलिव्हर (एच यु एल), ब्रिटानिया, सिप्ला, सन फार्मा, नेस्ले इंडियाचे शेअर्समध्ये तेजीची हिरवळ पसरली असून हिंदुस्थान युनिलिव्हर शेअर सर्वाधिक ४ टक्के वधारला आहे. दुसरीकडे, शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान अदानी समूहाचे समभाग १८ टक्के घसरले, त्यामुळे समूह कंपन्यांना एकूण दहा लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपचे नुकसान सहन करावे लागले.

अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले

आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना लोकसभा निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. यादरम्यान, सकाळपासूनच बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत असून घसरणीदरम्यान अदानी समूहाच्या सर्व सूचिबद्ध शेअर्समध्ये गळती दिसत असून बाजार उघडताच अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले असून शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, तर शेअर्समधील घसरणीमुळे गौतम अदानींची वैयक्तिक संपत्तीही कमी झाली आहे.