अवैध संपत्ती जमा करणार्‍या मानधनावरील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करा

0
12

महापालिकेच्या कर्मचार्‍याची आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

नगर – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मानधनावर कार्यरत असलेल्या दोन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमुळे इतर कर्मचार्‍यांवर अन्याय होत आहे. इतर कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणे दुरापस्त झाले आहे. त्याचबरोबर मानधनावरील या दोन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी शहरात अनाधिकृतपणे नळ कनेशन देऊन मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमा केली असून याबाबत सखोल चौकशी करून मानधनावरील या दोन्ही कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महापालिकेच्याच एका कर्मचार्‍याने केली आहे. या संदर्भात पाणी पूरवठा विभागातील बिगारी कर्मचारी सचिन दिलीप पटेकर यांनी महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, उपायुक्त, कामगार युनियन, जलअभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात हेडफिटर आणि फिटर या पदावर सेवानिवृत्त झालेले दोन कर्मचारी मानधनावर सेवेत कायम काम करत आहेत. सदर बाब शासन नियम आणि कायद्यास धरून नाही. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे.

सदर दोन्ही कर्मचारी काहीही काम न करता इतर कर्मचार्‍यांवर दादागिरी करून काम करून घेत आहेत. इतर कर्मचार्‍यांना उशीरापर्यंत थांबवून ठेवणे, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांचा दबाव आणून स्वत:ची कामे करून घेणे, स्वत:ची व इतर अधिकार्‍यांची घरगुती कामे करण्यास भाग पाडणे, असे प्रकार करत आहेत. त्याचबरोबर अनाधिकृत नळ कनेशन देऊन अवैध संपत्ती जमा करत असून मनपाचे नुकसान करत आहेत. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून झालेले नुकसान भरून घ्यावे, अशी मागणी पटेकर यांनी या तक्रारीतून केली आहे.