सर्व्हर डाऊनमुळे ई-भूमी अभिलेखची वेबसाईट बंद; अनेक कामे खोळंबली

0
55

डिजिटल सहीचा ‘७/१२’ उतारा मिळविण्यासाठी नागरिक पंधरा दिवसांपासून मारताहेत ‘सेतू’ च्या कार्यालयात चकरा

नगर – मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने शासनाची ई-भूमी अभिलेख वेबसाईट बंद असून, डिजिटील सहीचा ७/१२ उतारा मिळविणे नागरिकांसाठी जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे कर्ज प्रकरणे, खरेदी-विक्री, बक्षिसपत्रे अशी एक ना अनेक कामे अडकून पडल्याने शेतकर्‍यांसह मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत. आज प्रत्येक ठिकाणी डिजिटल सहीचा ७/१२ उतारा आवश्यक असून, या उतार्‍याच्या आधारेच बँकांची कर्ज प्रकरणे, गहाण तारण खत, खरेदी-विक्रीचे व्यवहार, बक्षिसपत्रे, भाडेकरार नोंदविले जातात. त्यामुळे शासकिय दैनंदिन कामकाजात डिजिटील ७/१२ महत्वाचा आणि अनिवार्य मानला जातो. परंतु मागील १० ते १५ दिवसांपासून ई-भूमी अभिलेख वेबसाईट बंद आहे. या वेबसाईटवरुन केवळ विनासहीचा ७/१२ उतारा मिळत असून, डिजिटल सहीचा उतारा मिळत नसल्याने नागरिकांची अनेक महत्वाची कामे खोळंबली आहेत. डिजिटल ७/१२ उतार्‍यासह शेतकर्‍यांसह नागरिक सेतू कार्यालय, तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. आठ ते दहा दिवसांपासून हेलपाटे मारुनही डिजिटल सहीचा ७/१२ उतारा निघत नसल्याने अनेक गरजवंत नागरिकासंमोर समस्या उभ्या राहिल्या आहेत. डिजिटील सहीचा ७/१२ मिळत नसल्याने केवळ एकाच व्यतीचे काम खोळंबले असे नाही तर अनेक नागरिक त्यामुळे त्रस्त झाले आहेत.

१० ते १५ दिवस सर्व्हर डाउन होणे आणि वेबसाईट बंद पडणे हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. डिजिटील ७/१२ साठी नागरिकांना अश्रू डहाळण्याची वेळ आली आहे. वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींबाबत महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासन आणि शासनाने तातडीने दखल घेवून डिजिटल ७/१२ चे कामकाज सुरळित करावे, अशी मागणी होत आहे. उतार्‍याअभावी कर्ज प्रकरण रखडल्याने वयोवृद्धाच्या डोळ्यात पाणी नगर तहसील कार्यालयासमोर असलेल्या एका सेतू कार्यालयात एक वयोवृद्ध नागरिक मागील १५ दिवसांपासून डिजिटल ७/१२ उतार्‍यासाठी हेलपाटे मारत आहेत. सेतूच्या दारात बसलेल्या या वयोवृद्धाशी नगरमधीलच पण सध्या परदेशातून आलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने बुधवारी (दि.२९) सहज संवाद साधला.

या संवादातून या वयोवृद्धासमोर उभ्या असलेल्या समस्या या तरुणाने जाणून घेतल्या. नातीच्या लग्नासाठी बँकेत कर्ज प्रकरण केले आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून डिजीटल सहीचा ७/१२ मिळत नसल्याने कर्ज प्रकरण अडकून पडले आहेत. लग्नकार्य जवळ आले आहे. त्यामुळे खर्चासाठी पैसे नाहीत. ७/१२ तत्काळ मिळाला असता तर बँकेच्या कर्जातून हा खर्च भागवता आला असता. मात्र आता उतारा मिळत नसल्याने मोठे आर्थिक संकटत उभे असल्याचे सांगताना या वयोवृद्ध व्यतीचे डोळे पाणावले होते. आज संगणकामुळे जग धावते झाले आहे. कोणतीही कागदपत्रे एका लिकवर डाऊनलोड होतात. सर्वत्र हायटेक कामकाज होत असताना आज डिजिटल सहीच्या ७/१२ साठी १५ दिवस हेलपाटे मारावे लागत असतील तर शासनाचे कामकाज कशा प्रकारे चालते, हे न बोललेलेच बरे, असे म्हणत या उच्चशिक्षित तरुणाने खंत व्यत केली