माणसाला एकूण किती शब्द माहिती असतात?
एखाद्या भाषेत एकूण किती शब्द असतात? या प्रश्नाचं उत्तर शोधताना ज्या अडचणी जाणवतात त्याहूनही अधिक अडचणी या प्रश्नाचं उत्तर देताना जाणवतात. कारण शब्द आणि शब्दसंग्रह या संज्ञांची व्याख्या आपण कशी करतो, यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. शिवाय माणसाची जीवनशैली, त्याचा व्यवसाय, त्याचं सामाजिक वातावरण वगैरे अनेक बाबींवरही या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. खेड्यातल्या व्यक्तीला केवळ शहरातच ज्यांचा संबंध येतो अशा अनेक शब्दांची माहिती असण्याची आवश्यकताच नसते. त्याच्या उलटही असतं. पाल, गावकूस, तिठा, पाणवठा वगैरे बाबींची माहिती शहरी माणसाला असण्याची शयता तशी कमीच. तीच बाब व्यवसायाची. पोस्टात काम करणार्या व्यक्तींना काही खास शब्दांची माहिती आवश्यक असते. बटवडा, बंटगी वगैरे शब्दांचा वापर करण्याची पाळी इतरांवर क्वचितच येते. त्यामुळे असे शब्द इतरांच्या शब्दसंग्रहात असण्याची आवश्यकताच नसते. आपल्या मर्यादित वर्तुळात वावरणार्या व्यक्तीला तसं करून चालत नाही. शिवाय बोली भाषा आणि लेखी भाषा असा फरक आहेच. बोली भाषेतल्या कित्येक शब्दांना शब्दकोशांमध्येही स्थान मिळत नाही; पण व्यक्तीच्या शब्दसंग्रहात त्यांचा समावेश असतो. कॉलेज तरुणांच्या भाषेत कंडा किंवा सही या शब्दांना वेगळाच अर्थ आहे. तो अर्थ इतर प्रौढांनाही माहिती असेलच असं नाही. ते शब्द इतरांच्या संग्रहात जसे असतात, तसेच त्या तरुणांच्या संग्रहातही असतात. मात्र, त्याचे दोन संपूर्णतया निरनिराळे अर्थ त्यांच्या ओळखीचे असतात. मग त्या तरुणांच्या बाबतीत संग्रहाची व्याप्ती दुप्पट-तिप्पट आहे, असं समजायचं काय? यामुळेच शब्दसंग्रहाच्या व्याप्तीबाबत वैज्ञानिकांमध्येही एकमत नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत १६ वर्षांच्या मुलाच्या संग्रहात १० ते १२ हजार शब्द असतात, तर कॉलेज पदवीधराचा शब्दसंग्रह त्याच्या दुप्पट मोठा म्हणजेच २० ते २५ हजार शब्दांचा असतो, असं सांगितलं जाई. ते कितपत खरं आहे, याचा पडताळा घेण्यासाठी डेव्हिड क्रिस्टल यांनी एक प्रयोग केला. त्यांनी शब्दकोशातली अधलीमधली पानं निवडून ती कॉलेज विद्यार्थ्यांना वाचायला दिली. त्यातले किती शब्द त्यांना माहिती आहेत, याची बेरीज करायला सांगितली गेली. त्यावरून त्यांना ६० ते ७५ हजार शब्द माहिती असतात, असा निष्कर्ष क्रिस्टल यांनी काढला; पण हे झाले केवळ शब्दकोशातले मूळ शब्द. त्यांचे निरनिराळे भावार्थ, प्रत्यय लावून केलेली त्यांची रूपं, विशेषणं, क्रियाविशेषणं इत्यादींचा समावेश केल्यास ही संख्या याहूनही जास्त असावी, असा संशय व्यक्त केला गेला आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी दुसरा एक प्रयोग केला गेला. त्यात दहा लाख शब्द असलेली एक साहित्यकृती निवडून त्यात शब्दकोशात येतील, असे किती मूळ शब्द आहेत, यांची गणती केली गेली. ती संख्या फक्त ३८ हजार झाली. त्यामुळे क्रिस्टल यांचा अंदाज बरोबर असावा, असा निर्वाळा आता दिला गेला आहे.