चांगल्या भवितव्यासाठी पालकांनी मुलांना मैदानावर घेऊन यावे : पद्मश्री पोपट पवार

0
31

४० व्या राज्य अजिंयपद मल्लखांब स्पर्धेचा मल्लखांबाच्या चित्तथरारक कवायतींनी समारोप

नगर – मैदानी खेळातून सदृढ शरीर व मन घडते. जीवनात उत्साह टिकून राहतो. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी पालकांनी मुलांना मैदानावर घेऊन यावे. कोरोनानंतर मैदाने ओस पडली. मोबाईलमध्ये भावी पिढी गुंतली असून, त्यांना मैदानावर घेऊन येण्यासाठी अशा स्पर्धेतून उत्तेजन मिळणार असल्याची भावना पद्मश्री पोपट पवार यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या राज्य अजिंयपद मल्लखांब स्पर्धेच्या समारोपप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. यावेळी आ. संग्राम जगताप, पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर, प्रा. खासेराव शितोळे, श्रेणिक शिंगवी, गिरीश कुलकर्णी, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे, सचिव श्रेयस म्हसकर, कोषाध्यक्ष बापूसाहेब समलेवाले, सहसचिव विश्वतेज मोहिते, पांडूरंग वाघमारे, अनिल नागपुरे, यशवंत जाधव, अ‍ॅड. संजय केकाण, सचिन परदेशी, मोहन झुंजे पाटील, नगरचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, उपाध्यक्ष राजाभाऊ आवसक, नंदेश शिंदे, सचिव अनंत रिसे, सहसचिव अजित लोळगे, मोहनीराज लहाडे, तांत्रिकचे निलेश कुलकर्णी, अमित जिनसीवाले, विष्णू देशमुख, सतीश दारकुंडे, एम.एफ. आयचे प्रकाश सोनी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजीत शिंदे, माया मोहिते, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी खेळाडू मुला-मुलींनी पोल मल्लखांबावर द्रोणासन, बजरंगी, हाताचा फरारा, घाणा, पद्मासन, पोटाचा फरारा तर रोप मल्लखांबावर नटराजासन, गिरकी घेऊन कलाट मारणे, ध्यानासन, झाप मारणे, गौराई, अडवा फरारा, बजरंगी कलाट अशा चित्तथरारक मल्लखांबाच्या कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेतून शारीरिक लवचिकता व चपळपणाचा उत्कृष्ट खेळ पहावयास मिळाला. तसेच जामखेड येथील शंभू सूर्य अकॅडमीच्या युवक-युवतींनी शिवकालीन मर्दानी खेळाचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. लाठी काठी, तलवार, दाणपट्टा व भाला आदी सशास्त्रांच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, मैदानी खेळातून जीवनात ऊर्जा मिळते. सक्षम भारत, सदृढ युवक निर्माण करण्यासाठी मैदानी खेळांचा महत्त्वाचा वाटा ठरणार आहे. खेळातून पुढे आलेल्या युवकाची शारीरिक सदृढता व आरोग्य संपत्ती चांगली राहते. शासनाने खेळाडूंना नोकरीत आरक्षण देखील दिले आहे. सध्या परिस्थिती बदलून पालक वर्ग जागृक झाले असून, मुलांना खेळासाठी मैदानावर घेऊन येत आहे. मल्लखांबातून राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या खेळाडूंसाठी सरकारी नोकरीचा लाभ मिळावा या दृष्टीने शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पद्मश्री उदय देशपांडे म्हणाले की, पॅरिस मध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेत दोन अंध मुले-मुली मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मल्लखांबाने शरीराबरोबर मन देखील कणखर बनते, एकाग्रता वाढते. आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे मल्लखांब आहे. त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जगभर प्रयत्न सुरु आहे. जर्मन मध्ये जाऊन १६०० मुलांना मल्लखांबाचे धडे दिल्याचे त्यांनी सांगितले. तर मल्लखांबशिवाय पर्याय नाही, या कवितेने त्यांनी मल्लखांबाचे महत्त्व विशद केले. गणेश देवरुखकर यांनी उत्तम प्रकारे नियोजन करुन स्पर्धा यशस्वी केल्याचे स्पष्ट केले. निलेश कुलकर्णी यांनी संघटनेची भूमिका विशद करुन राज्य संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त केले. पालकांनी देखील आपल्या मनोगतातून उत्तम प्रकारे स्पर्धेचे नियोजन करण्यात आल्याची भावना विशद केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश शिंदे यांनी केले. आभार अनंत रिसे यांनी मानले. ४० व्या राज्य अजिंयपद मल्लखांब स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- सांघिक विजेतेपद १२ वर्षाखालील मुले प्रथम- मुंबई शहर, द्वितीय- सातारा, तृतीय- पुणे, १२ वर्षाखालील मुली प्रथम- सातारा, द्वितीय- मुंबई उपनगर, तृतीय- पुणे. १४ वर्षाखालील मुले प्रथम- सातारा, द्वितीय- मुंबई उपनगर, तृतीय- पुणे, १४ वर्षाखालील मुली प्रथम- मुंबई उपनगर, द्वितीय- सातारा, तृतीय- पुणे. वैयक्तिक विजेतेपद १२ वर्षे मुले प्रथम-श्रेयांश शिंदे (मुंबई शहर), द्वितीय- स्वयं कांबळे (मुंबई शहर), तृतीय- विघ्नेश गाढवे (सातारा), १२ वर्षे मुली प्रथम- स्नेहा मोरे (सातारा), द्वितीय- आरोही मोरे (सातारा), तृतीय- रुही पाटील (मुंबई उपनगर). वैयक्तिक विजेतेपद १४ वर्षे मुले प्रथम- ओम गाढवे (सातारा), द्वितीय- आयुश शिंदे (सातारा), विराज आंब्रे (मुंबई उपनगर), १४ वर्षे मुली प्रथम- ह्रद्या दळवी (मुंबई शहर), द्वितीय- तन्वी दवणे (मुंबई उपनगर), तृतीय- काव्यश्री मसुरकर (मुंबई उपनगर).