शेअर बाजार निर्देशांकाची उच्चांकी पातळीवर सुरुवात

0
110

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेस ७५६७९ वर तर निफ्टी २३०४३ अंकांवर; अदानी समूहाला सर्वाधिक फायदा

मुंबई – शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीचा कल सोमवारी (२७ मे) आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिला आहे. सकाळी बाजार उघडताच शेअर बाजाराने नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवला असून, व्यवसाय दरम्यान, मिडकॅप निर्देशांकानेही विक्रमी उच्चांक गाठला. बीएसई सेन्सेसने ७५,६७९ अंकांची पातळी गाठली तर निफ्टीही २३,०४३ अंकावर पोहोचला. दरम्यान, बाजाराच्या तेजीचा सकाळच्या सत्रात अदानी समूहाला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून, सूचिबद्ध १० पैकी ९ कंपन्यांचे शेअर्स वधारले तर फक्त अदानी एंटरप्रायझेसचा शेअरमध्ये घसरण दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, दोन्ही शेअर बाजार निर्देशांक बीएसई आणि एनएसई हिरव्या रंगात रंगले. बीएसई सेन्सेसची २१४.२० अंकांच्या वाढीसह ७५,६२४.५९ पातळीवर ओपनिंग झाली तर एनएसई निफ्टी २३,०३८.९५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यापार सत्रात निफ्टी ५७.४० अंकांच्या किंचित वाढीसह २३,०१४.५० स्तरावर व्यवहार करत होता. दरम्यान, बाजारातील तेजीचा बॉम्बे स्टॉक एसचेंजला सर्वाधिक फायदा होत असून बीएसईचे मार्केट कॅप रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहेत. सध्या बीएसईचे बाजार भांडवल ४१९.८२ लाख कोटींवर पोहोचले असून, आता मार्केट कॅपने जवळपास ४२० लाख कोटींचा आकडा पार केला आहे.

सेन्सेसमधील शेअर्सची स्थिती काय

बाजाराच्या सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेसमध्ये सूचिबद्ध ३० पैकी १९ शेअर्समध्ये हिरवळ दिसत असून, ११ शेअर्स घसरत आहेत. सेन्सेसमधील तेजीचा एचडीएफसी बँकेचा स्टॉक लाभधारक ठरला आणि १.१६ टक्क्यांनी वधारला. तसेच कोटक महिंद्रा बँक ०.९९ टक्के आणि इंडसइंड बँक ०.९३ टक्क्यांनी वधारला. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट ०.९० टक्के आणि भारती एअरटेल ०.७६ टक्क्यांनी वर चढला. याउलट, विप्रो लिमिटेडचा स्टॉक सर्वाधिक १.५० टक्क्यांनी घसरला असून मारुती १.२०% खाली आता तर एनटीपीसी, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकलाही प्रचंड नुकसान झाले.

निफ्टीत कोण तेजीत, तर कोण घसरले

एनएसई निफ्टीच्या ५० पैकी २४ स्टॉकमध्ये तेजी दिसत असून, २४ शेअर्स घसरत असताना दोन शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. डिव्हीज लॅबच्या स्टॉकने सर्वाधिक ५.५२ टक्क्यांनी झेप घेतली तर हिंदाल्को १.४५%, अदानी पोर्टस् १.१५%, इंडसइंड बँक १.०६% आणि एचडीएफसी बँक ०.९९% वाढीसह व्यापार करत आहे. दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेस २.७१%, विप्रो १.६५%, ओएनजीसी १.६१% खाली घसरला आहे.