शहराच्या मध्यवस्तीतील फ्लॅटमध्ये भरदिवसा चोरी

0
44

सोन्या चांदीचे व मोत्याचे दागिने, रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास; गुन्हा दाखल

नगर – नगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे व मोत्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनि चौक परिसरातील गुजर गल्ली येथील आनंदवन अपार्टमेंटच्या दुसर्‍या मजल्यावर शुक्रवारी (दि.२४) दुपारी १ ते २ या कालावधीत घडली आहे. याबाबत विशाल चंद्रकांत गांधी (रा. वय ५१, रा.फ्लॅट नं. २०१, दुसरा मजला, आनंदवन अपार्टमेंट, गुजर गल्ली) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गांधी हे व्यावसायिक असून ते कुटुंबासह गुजर गल्ली येथील आनंदवन अपार्टमेंटच्या दुसर्‍या मजल्यावर राहतात. शुक्रवारी (दि.२४) त्यांचे कुटुंबीय फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून उचकापाचक केली. यावेळी त्यांनी सोन्या चांदीचे व मोत्याचे असे एकूण १८ तोळे वजनाचे दागिने तसेच रोख रक्कम असा ७ लाख ९ हजार २५० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

दुपारी निदर्शनास उशिरा आल्यावर चोरीची गांधी घटना यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे प्रभारी पो. नि. आनंद कोकरे, स.पो.नि. जानकर, महिला स.पो. नि. योगिता कोकाटे यांच्या सह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. कोतवाली व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू केला आहे. याबाबत विशाल गांधी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध ४५४, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शहराच्या मध्यवस्तीत भर दुपारी मोठी घरफोडी झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे घर मध्यवस्तीत असून आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. तरीसुद्धा चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करून पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभे केले आहे. नगर शहर व परिसरात सध्या घरफोड्या आणि भुरट्या चोर्‍या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.