निराधार योजनेचे मानधन ’डीबीटी’ मार्फत बँक खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थ्यांनी ३० मे पर्यंत कागदपत्रे सादर करावीत

0
38

संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजू दारकुंडे यांचे आवाहन 

नगर – केंद्र व राज्य सरकारतर्फे निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठरावीक मानधन दिले जाते. हे मानधन आता यापुढे थेट डीबीटीमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांना आपले खाते आधार लिंक करून कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून घ्यावी असे आवाहन नगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजू दारकुंडे यांनी केले आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयाकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. त्यानंतर हा निधी संबंधित लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ जात असे. त्यामुळे अनेकदा लाभार्थ्यांना मानधनासाठी बँकेत हेलपाटे मारावे लागत असे. परंतु या पुढे मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत लाभार्थी यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने या लाभार्थ्यांचे बँकेतील हेलपाटे थांबणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना गावातील तलाठी यांच्याकडे हयातीचा दाखला. आधारकार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबर द्यावे लागणार आहे. आधार लिंक ज्या बँक खात्याला असेल, त्याच बँक खात्यात मानधन जमा होणार आहे.

कागदपत्रे देण्यासाठी ३० मे पर्यंत मुदत

या योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला. आधारकार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबर द्यावे ही कागदपत्रे जमा करण्यासाठी ३० मे पर्यंत मुदत आहे. या मुदतीत लाभार्थ्यांनी गावातील तलाठ्यांकडे किंवा समितीचे सदस्य अथवा तहसील कार्यालय कागदपत्रे जमा करावीत. कोणत्याही एजंटाकडे जमा करू नयेत असे आवाहन समिती अध्यक्ष राजू दारकुंडे यांनी केले आहे तसेच गावोगावी या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कागदपत्रे जमा केले नाही तर पेन्शन बंद होईल अशा स्वरूपाचे काही एजंट व सेतू चालक सांगत आहेत तरी कोणी अशा भुलथापांना बळी पडू नये असे आवाहनही दारकुंडे यांनी केले आहे.