सिध्दी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात ३५१ रक्त पिशव्यांचे संकलन
नगर – मूळचे नगरचे असलेल्या छाजेड परिवाराने पुणे येथे सिद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून रक्तदानाचा महायज्ञ चालवला आहे. स्व. मदनलाल कचरदास छाजेड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी हे शिबिर घेण्यात येते. या वर्षी शिबिरात ३५१ जणांनी रक्तदान केले़. पुण्यातील नवी पेठेतील आनंदऋषीजी रक्तपेढी येथे सदर शिबिर झाले. सौ़ सिध्दी छाजेड नहार यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली. सिद्धी फाऊंडेशनचे संस्थापक तथा अहमदनगरमधील स्काय ब्रिज गृहप्रकल्पाचे प्रवर्तक मनोज छाजेड, अध्यक्ष ललित जैन आणि मुकेश छाजेड हे या शिबिराचे आयोजन करतात़. यंदा तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे़. त्यापार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर महत्वाचे मानले जात आहे़. याबाबत मनोज छाजेड म्हणाले की, दरवर्षी २१ मे रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्याची सिद्धी फाऊंडेशनरची परंपरा आहे़. गेल्या तीन ते चार वर्षांत कोरोना आणि इतरही संकटे आली, तरीही आम्ही शिबिरात खंड पडू दिला नाही़. दरवर्षी मे महिन्यात शहरात रक्ताची कमतरता असते, ती उणीव भरून काढण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून सिद्धी फाऊंडेशन, आमचा मित्रपरिवार आणि इतर मंडळींनी यावर्षीही रक्तदान शिबीर यशस्वी केले़. गेल्या १६ वर्षांत तब्बल ३३ हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले़.
आचार्य आनंदऋषीजी महाराज आमचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळानजीक स्काय ब्रिज हा मोठा गृहप्रकल्प उभारला आहे. नगरच्या मातीत झालेले संस्कार कायम मनात असतात. त्यामुळेच वडिलांच्या स्मृतीत दरवर्षी रक्तदान शिबीर घेऊन जनसेवा केली जाते. या शिबिराप्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिनेंद्र लोढा, शांतीलाल गांधी, लोकेश जैन, नितेश जैन, राम बांगड, नीरज कांकरीया, सिध्दांत छाजेड, योगेंद्र चोरडिया, वैभव सेटीया, जीवन बेद, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते़ सद्यस्थितीत पुणे शहरात ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असून कडायाचा उन्हाळा आहे़. शहरात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़. सिध्दी फाऊंडेशन दरवर्षी कडायाच्या उन्हाळ्यात शहरात असणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबीरात प्रतिसाद मिळत असतो ही सकारात्मक बाब आहे़.