नगर तालुक्यातील गावठी हातभट्‌ट्यांवर पोलिसांचे छापे

0
29

७० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हे दाखल

नगर – नगर तालुयातील निमगाव वाघा, नेप्ती शिवारातील तीन गावठी हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली. दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन, तयार हातभट्टी दारू व साधने असा ७० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुमार दादाभाऊ फलके (वय ३५, रा. निमगाव वाघा) हा निमगाव वाघा शिवारात घराच्या आडोशाला हातभट्टी दारू तयार करत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ३०० लिटर कच्चे रसायन व ३५ लिटर दारू असा १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. पोलीस अंमलदार जालिंदर माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख बाबा जपकर (रा. नेप्ती) याला घराच्या पाठीमागील खळ्यात हातभट्टी दारू तयार करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून ४०० लिटर कच्चे रसायन व ३५ लिटर तयार दारू असा २३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. पोलीस अंमलदार माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई नेप्ती शिवारात केली. शरद माणिक पवार व भरत माणिक पवार (दोघे रा. नेप्ती) हे दोघे घरासमोरच हातभट्टी दारू तयार करत होते. पोलिसांनी छापा टाकून तेथून ५०० लिटर कच्चे रसायन, ३५ लिटर तयार दारू असा २८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. पोलीस अंमलदार अतुल लोटके यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.