नगरमधील २ तरुणांचा जलाशयात बुडून मृत्यू

0
43

एकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी तर दुसर्‍याचा सोमवारी सकाळी सापडला 

नगर – पारनेर तालुयातील कर्जुले हर्या जवळील मांडओहोळ जलाशयात फिरायला गेलेल्या नगरमधील ६ पैकी दोघा तरुणांचा रविवारी (दि.१९) दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून संध्याकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. तर दुसर्‍या मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. अखेर सोमवारी (दि.२०) सकाळी नऊच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही सापडला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८) व सौरभ नरेश मच्छा (१८, दोघेही रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड) असे दोघा मयत तरुणांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नगर शहरातील नगर कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील मयत अथर्व श्रीनिवास श्रीराम, मयत सौरभ नरेश मच्छा यांच्यासह चैतन्य बालाजी सापा (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड), आकाश अनिल हुंदाडे , जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा), अभिलाष रघुनाथ सुरम हे सहा जण दुचाकीवरून रविवारी (दि.१९) पारनेर तालुयातील निघोज येथील मळगंगा देवी मंदिर, कुंड परिसरात फिरायला गेले होते. तेथून त्यांनी मांडओहोळ जलाशयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यावर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धावा केला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाल्यावर त्यांनी पारनेर पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पारनेर पोलीस घटनास्थळी आले व पोलिसांनी आणि इतरांनी बुडालेल्या तरुणांचा शोध सुरु केला. सायंकाळी उशिरा अथर्व श्रीराम याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात यश आले, मात्र सौरभ मच्छा याचा मृतदेह सापडला नाही. रात्री अंधारामुळे शोध कार्य थांबवून सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरु करण्यात आले. अखेर सकाळी ९ वाजेच्या सुमारास सौरभ मच्छा याचा मृतदेह सापडला.