शहरातील मनपाच्या उद्यानांची लूट थांबून सुधारणा न झाल्यास १ जूनला आंदोलन

0
41

आश्वासनाने बागोड्या सत्याग्रह तात्पुरता स्थगित, देशात रामराज्य येण्याऐवजी रामभरोसे राज्य

नगर – शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहात, तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरु असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञाक चळचळीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला बागोड्या सत्याग्रह महापालिका प्रशासनाच्या आश्वासनाने तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मनपाच्या उद्यानात सर्वसामान्यांची लूट थांबून सुधारणा न झाल्यास १ जून रोजी बागोड्या सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या पंटरांना उद्यानाची खैरात करणारे व उद्यानाकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास लक्ष्मी उद्यानात विजेच्या खांबाला डांबून बागोड्या सत्याग्रह केले जाणार होते. महापालिका प्रशासनाने आवश्यक कारवाई करण्याचे पत्र संघटनेला पाठविले आहे. अहमदनगर महापालिका स्वातंत्र्योत्तर काळातील ईस्ट इंडिया कंपनी झाली आहे. लोकभज्ञाक चळवळीने शहरातील लक्ष्मी उद्यानासह सर्व बागांमध्ये मुलांच्या खेळण्याच्या साधनांची कमतरता आणि ठेकेदारांकडून शोषणाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरुन महापालिकेने त्यांच्याच कार्यकर्त्यांना उद्यानाचे ठेके दिले आहेत.

मरया घोड्यावर बसण्यासाठी ३० रुपये घेतले जातात, अनेक झोके तुटलेले आहेत व खेळणी गंजलेली आहे. परंतु त्याबाबत महापालिकेला काही एक खंत नाही, तर काही उद्यानात थेट खाजगी झोकेवाले अव्वाच्यासव्वा रुपये नागरिकांकडून वसूल करत आहे. नगरसेवक व पदाधिकार्‍यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा हवी आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर त्यांचा काही एक वचक नाही. महापालिका म्हणजे एक अंधेरी नगरी झाली असल्याची खंत लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी अधिकार्‍यांना लोकांबद्दल भक्ती नाही, त्यांच्या प्रश्नांचे ज्ञान नाही आणि लोकांसाठी काम करण्याची अजिबात प्रवृत्ती नाही. त्यामुळे नाईलाजाने या देशात रामराज्य येण्याऐवजी रामभरोसे राज्य राबविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकभज्ञाक चळवळीसाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, ओम कदम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.