बोकडाचा भोळेपणा
एक कोल्हा सकाळपासून शिकारीसाठी हिंडत होता. दुपार उलटली, तरी त्याला सावज काही मिळाले नाही. उन्हा-तान्हात हिंडून तहानेने जीव मात्र व्याकुळ झाला. म्हणून तो इकडे-तिकडे प्यायला कुठे पाणी मिळते का, ते शोधू लागला. एका ठिकाणी त्याला विहीर दिसली, म्हणून पाणी किती खोल आहे, हे तो विहिरीत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात तोल जाऊन तो विहिरीत पडला. आता विहिरीबाहेर कसे पडावे, याचा तो विचार करीत असता एक बोकडही पाणी पिण्यासाठी तेथे आला. विहिरीच्या काठावर उभे राहत तो विहिरीत असलेल्या कोल्ह्याला म्हणाला, “काय रे मित्रा, प्यायला पाणी चांगले आहे का?” त्यावर कोल्हा ढोंगीपणाने म्हणाला, “अरे बोकड़दादा, पाणी नुसते चांगलेच नाही, अमृतासारखे गोड आहे बघ.” हे ऐकताच मागचा-पुढचा विचार न करता बोकडाने विहिरीत उडी टाकली. बोकडाची शिंगे चांगलीच लांब होती. कोल्ह्याने ही संधी हेरली. बोकडाच्या शिंगावर उभा राहात त्याने विहिरीबाहेर उडी मारून संकटातून आपली सुटका करून घेतली. बोकड मात्र पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊन मरण पावला. तात्पर्य ः लबाड लोकांच्या आमिषाला फसू नये.