नगर – महसूलचा अधिकारी असल्याची बतावणी करून पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याची भिती दाखवून वृध्दाच्या गळ्यातील चेन लंपास केली. नगर- पुणे रस्त्यावरील निशा लॉनच्या पुढे एमएसईबी ऑफीसच्या समोर केडगाव शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र एकनाथ सत्रे (वय ६२, रा. कापरे मळा, सोनेवाडी रस्ता, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेअकरा वाजता मच्छिंद्र हे त्यांचा चुलत भावासोबत नगर- पुणे रस्त्याने दुचाकीवरून घरी जात असताना केडगाव शिवारात निशा लॉनच्या पुढे एमएसईबी ऑफीसच्या समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने त्यांना दुचाकी थांबविण्यास सांगितली. त्याने ‘मी महसूलचा अधिकारी आहे’, अशी बतावणी केली. ‘पुढे पोलिसांची नाकाबंदी चालू असून तुमच्या गळ्यातील चेन माझ्यापाशी द्या, मी पुढे गेल्यावर तुमची चेन तुम्हाला देऊन टाकतो’ अशा बहाणा करून दिशाभूल केली. मच्छिंद्र यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन त्यांच्याकडील २७ हजार रूपयांची सोन्याची चेन काढून दिली. तो व्यक्तीने सोन्याची चेन घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मच्छिंद्र यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.११) फिर्याद दिली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार सतिष लगड करत आहेत.