बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

0
19

फसवणूक झाल्यास तक्रारी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

नगर – खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकर्‍यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा, निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास शेतकर्‍यांनी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष किंवा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील (०२४१) २३५३६९३ किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील (०२४१) २४३०७९२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. नगर जिल्ह्यात कृषि निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षांची जबाबदारी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक राहुल ढगे (मो.नं.७५८८५५६२७९), मोहिम अधिकारी अमृत गांगडे (मो.नं.७५८८१७८८४२) यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व समिती स्थापना करण्यात आलेली आहे.

तालुका कृषि अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हा स्तरावर १ प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी १५ भरारीपधके नियुक्ती केली आहेत. शेतकर्‍यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी. खरेदी पावतीवरील लॉट नंबर व बियाण्याच्या बॅगवरील टॅग व लॉट नंबर पडताळून पहावे. बियाणे बॅग फोडताना वरील बाजूचा टॅग बॅगेला तसाच राहावा, यासाठी खालच्या बाजूने फोडावी, बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार उदभवल्यास तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करणे सोईचे होण्यासाठी बियाण्याची फोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी, किटकनाशके किंवा तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासुन घ्यावी. अधिकृत विक्री केंद्रामधूनच खते खरेदी करावीत. फिरत्या वाहनामधून खतांची विक्री होत असल्यास तक्रार करावी. खतांचा ई-पॉस साठा, प्रत्यक्षातील साठा तपासला जाईल. तरी निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या बोगस निविष्ठांची विक्री करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.