ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा सुजय विखे, आ.संग्राम जगताप यांनी केला निषेध

0
146

नगर – न्यायालयाच्या आवारातच अ‍ॅड. अशोक कोल्हे यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अ‍ॅड. कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (दि.९) दुपारी डॉ. सुजय विखे आणि आ. संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणार्‍यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. अ‍ॅड. कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला.