छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवा अन्यथा ११ मेपासून आमरण उपोषण करणार

0
46

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा महापालिका आयुक्तांना इशारा

नगर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा ११ मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखाताई सांगळे, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, दत्ता वामन, दीपक गहिले, किरण वाघ, भैय्या पठाण, केशव बरकते, अभय पतंगे, शंकर आटोळे, विलास कराळे, साहेबराव पाचारणे, सुनील ठाकरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना २ मे २०२२ रोजी व २३ जून २०२२ रोजी पालकमंत्री यांना १ मे २०२३ रोजी ना हरकत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला असून, त्यांचा पाठपुरावा आम्ही केला आहे. अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पण २ मे २०२२ व २३ जून २०२२ रोजी पत्र देऊन सदर विभागाचे ना हरकत आलेली असून, वर्क ऑर्डर होऊन काम चालू असून, छत्रपती संभाजीराजे जयंतीपूर्वी लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक, अहमदनगर येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने ११ मे रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.